पाथर्डी येथे तिलोक जैन विद्यालयाचा आगळा वेगळा उपक्रम
By Admin
पाथर्डी येथे श्री तिलोक जैन विद्यालय येथे आगळावेगळा उपक्रम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 30 एप्रिल 2021
सद्यस्थितीत संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे , विविध आस्थापना बंद आहेत. सर्वत्र वर्क फ्रॉम होम सुरू आहे. याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही . सध्या सर्वत्र शाळा बंद ,परंतु शिक्षण सुरू या उपक्रमा अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. गत मार्च महिन्यापासून अशा प्रकारचे शिक्षण सुरू असल्याने विद्यार्थी देखील आता थोडेसे कंटाळले असून त्यांची रुची कमी होत आहे असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या समस्येवर मात करून विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने शिक्षण देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने श्री तिलोक जैन विद्यालयात प्राचार्य अशोक दौंड यांच्या मार्गदर्शनातून 'हसत खेळत शिकुया' या उपक्रमाची संकल्पना पुढे आली . सदर संकल्पनेस सुनिल मरकड ,अजिंक्य कांकरिया, बाळासाहेब गांगुर्डे ,गणेश ताठे, अशोक गर्जे, सुनिल कटारिया, श्रीकांत काळोखे , विक्रम हराळ , प्रकाश लवांडे यासह इतर सर्व सहकारी शिक्षकांनी साथ दिली. या सर्वांनी प्राथमिक ,माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभागाची स्वतंत्रपणे कमिटी तयार केली. या कमिटीच्या माध्यमातून या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञ मार्गदर्शकांची वेगवेगळ्या विषयावर व्याख्याने आयोजित करण्याचे ठरले . प्रामुख्याने हसत-खेळत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात कशी वृद्धी होईल या दृष्टीने उपयुक्त व्याख्यानाचे आयोजन असावे असे ठरले. त्या नुसार योग व प्राणायाम, पन्हाळगड ते विशाळगड , इंन्स्पायर अवार्ड व विज्ञान प्रदर्शन यातील विविध संधी, लोकगीते व पोवाड्यातून समाज प्रबोधन, विद्यालयाची ओळख, ऊर्जा नवी क्षितिजे ,मानसिक आरोग्य, स्क्रीनच्या मोहजालात हरवलेली तरूणाई, महाराष्ट्रातील गड किल्ले - ऐतिहासिक वारसा , इतिहासाचे आकलन, वर्तमानाचे भान आणि भविष्याचा वेध या सह चित्रकला, कार्यानुभव ,गोष्ट खेळाडूंची ,गणित ,इंग्रजी ,हिंदी इतिहास इ.विषयावर प्रश्न मंजुषा, विविध खेळांची माहिती इ. विविध विषयावर हसत खेळत शिक्षण दिले गेले . या मध्ये महाराष्ट्रातील विविध तज्ञ मार्गदर्शक यांना निमंत्रित करण्यात आले होते. यात प्रामुख्याने निमसे (अहमदनगर) , सतिश काळे (अकोले), बाळासाहेब डोंगरे (राहुरी), विशाल लाहोटी (अहमदनगर), डॉ. मूक्तेश दौंड (नाशिक) , अमोल कुलकर्णी (नाशिक) , राजेश इंगळे (श्रीगोंदा), प्रा. नवनाथ वाव्हळ (अहमदनगर) , प्राचार्य अशोक दौंड यांच्या सह विद्यालयातील विविध शिक्षकांनी वेगवेगळ्या विषयावर हसत-खेळत व्याख्याने घेतली. विद्यार्थी व पालक वर्गातून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले . या उपक्रमाबाबत अनेक पालकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतांना शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना भविष्यकालीन वाटचालीत खूप फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या आगळ्यावेगळ्या व अनोख्या पद्धतीने राबविलेल्या उपक्रमाबद्दल विद्यालयाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.