वांबोरी चारीला पाणी सोडा.
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मुळा धरणात सुमारे वीस टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याने पाथर्डी, नगर, राहुरी, नेवासा तालुक्यातील 45 गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या भागाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे.
पाथर्डी तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची बाजरी कपाशी मूग ही सर्व पिके आता पूर्णता वाया गेली असून अनेक शेतकऱ्यांवर पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ आली. मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या पाथर्डी नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी पाणी सोडण्यात आले तर या पाण्यामुळे काही अंशी पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न मार्गी लागू शकतो, असेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.