महाराष्ट्र
1635
10
भगवान उद्यान व डॉ. विधाटे क्रीडासंकुल नागरिकांसाठी नवसंजीवनी
By Admin
भगवान उद्यान व डॉ. विधाटे क्रीडासंकुल नागरिकांसाठी नवसंजीवनी
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी शहराच्या मध्यवस्तीत असणारी उद्याने म्हणजे लहान मुलांना खेळण्या- बागडण्याचे हक्काचे व्यासपीठ. अबालवृद्धांना मनमोकळ्यापणाने फिरण्यासाठी व आपल्या समवयस्कांशी गप्पा मारण्याचा कट्टा म्हणजे ही उद्याने!
क्रीडा संकुलात फेरफटका मारून स्वच्छ व प्रदुषणमुक्त वातावरणात सकाळचा अर्धा तास घालवला की, मन उल्हासित होते. दिवसभर काम करण्यास त्यामुळे एक वेगळीच उर्जा मिळते. पाथर्डी शहरातील फुलेनगर उपनगरातील भगवान उद्यान आणि डॉ. स. का. इधाटे क्रीडासंकुलाचा वापर शहरातील लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजन करत असून नुकताच अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या उद्यानाचा चेहरामोहरा बदलण्यात आला. सध्या असलेले कोरोनाचे संकट व पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोगांच्या समस्या पाहता संपूर्ण उद्यान व क्रीडा संकुलाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. अनावश्यक वाढलेले गाजर गवत काढून खुरपणी करण्यात आली.
भगवान उद्यानातील जीर्ण व खराब झालेला मुख्य नामफलक बदलून नवीन व आकर्षक नामफलक बसविण्यात आला. रंग रंगोटी व ठिकठिकाणी पर्यावरण पूरक सुविचार टाकण्यात आल्यामुळे उद्यानाला नवी झळाळी प्राप्त झाली. उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनेक झाडे लावण्यात आली असून त्यामध्ये विविध प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचाही समावेश करण्यात आला. मागील एक वर्षापासून उद्यानातील सर्व झाडांची देखभाल अभय आव्हाड प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असून नगरपालिकेच्या नळ कनेक्शनद्वारे व पाणीटंचाईच्या काळात स्वखर्चाने टँकरने या झाडांना पाणीपुरवठा करण्यात येतो. उद्यान व क्रीडा संकुलाचा बदलेलेले रुपडे आता शहरातील फुलेनगर, साईनाथ नगर परिसरातील स्थानिक नागरिकांस आकर्षित करत असून त्यांची पावले आपोआपच सकाळ-संध्याकाळी या उद्यान व क्रीडा संकुलाकडे वळत आहेत. शहरातील ही ठिकाणे नैसर्गिक ऑक्सिजनचा पुरवठा करणारी केंद्रे बनली असून व्यायाम व विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून नागरिक या भागास पसंती देत आहेत. क्रीडासंकुलात येत्या काही दिवसात भाविकांसाठी दत्त मूर्ती बसविण्याचा व युवकांसाठी ओपन जिम करण्याचा मनोदय अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून करण्यात आला आहे.
धकधकीच्या जीवनात शहरातील भगवान उद्यान व डॉ. स.का. इधाटे क्रीडासंकुल नागरिकांसाठी नवसंजीवनी देणारं केंद्रच म्हणावे लागतील. या ठिकाणांच्या आधुनिकीकरनाबद्दल शहरातील नागरिकांकडून प्रतिष्ठानचे कौतुक करण्यात येत आहे.
Tags :

