ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत द्या- शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी- शेवगांव तालुक्यामध्ये महापुरामुळे व सततच्या अती पर्जन्यवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला असुन सततच्या पावसामुळे शेतातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रमाणापेक्षा जास्त पावसामुळे शेतकऱ्यांची पिके सडली आहेत. पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला असून शासनाच्या मदतीची वाट पाहत आहे.
महाराष्ट्र शासनाने पंचनामे करण्यात वेळ घालवण्याऐवजी पाथर्डी- शेवगांव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून महाराष्ट्र शासनाने सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत जाहीर करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आधार द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चा अहमदनगर दक्षिणचे सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी केली आहे.
प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकामध्ये ढाकणे म्हणाले की, शेतकऱ्यांनी सेवा सोसायटी व खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले आहे, परंतु अतिपर्जन्यवृष्टीमुळे हातात आलेले शेतातील सर्व पिके सततच्या पावसामुळे सडून गेली आहेत. पिकांचे प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी कधी नव्हे एवढया मोठया संकटात सापडला आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकारने पंचनामे करून वेळकाढूपणाचे धोरण स्विकारले आहे.
शेतकरी हिताचे सरकार म्हणायचे, मात्र शेतकऱ्यांना मदतीसाठी सारखे ताटकळत ठेवावायचे, हे चुकीचे धोरण आहे. महाराष्ट्र सरकार खरेच शेतकरी हिताचे असेल, तर तातडीने निर्णय घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा व ओल्या दुष्काळच्या सर्व सुविधा जाहीर कराव्यात आणि शेतकरी वर्गास तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे महाराष्ट्र शासनास केली आहे.