महाराष्ट्र
32272
10
मिरी-तिसगाव पाईपलाईन काम निकृष्ट ; खोलीबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रम
By Admin
मिरी-तिसगाव पाईपलाईन काम निकृष्ट ; खोलीबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील 43 गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या कामासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तब्बल 155 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पाथर्डी तालुक्यातील लाभधारक गावामध्ये या योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, पाईपलाईनसाठी सुरू असलेले खोदकाम निकृष्ट पद्धतीचे सुरू आहे. खोलीबाबत शेतकर्यांमधून संभ्रम व्यक्त करण्यात येत असून, या कामाच्या चौकशीची मागणी करत काम बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
राघूहिवरे, लोहसर, खांडगाव भोसे, वैजूबाभळगाव, करंजी या भागात या योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. हे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. शासन नियमाप्रमाणे 75 सेंटीमीटर खोली असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात 30 ते 35 सेंटीमीटर म्हणजे निम्म्यावरच खोली घेत लगेच पाईप टाकून ही पाईपलाईन उरकून घेण्याचा सपाटा संबंधित ठेकेदाराने सुरू केला असल्याचे लाभधारक शेतकर्यांचे म्हणणे आहे. काही शेतकर्यांनी तर संबंधित ठेकेदारांच्या कामगारांसमोरच या खोदलेल्या पाईपलाईनची मोजणी केली.
या पाईपलाईनमुळे अनेक रस्त्यांचे, तसेच रस्त्याच्या बाजूने उभ्या केलेल्या विजेच्या खांबांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पाईपलाईन झाल्यानंतर या रस्त्यांची दुरुस्ती कोण करणार, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. यापूर्वीही मिरी- तिसगाव नळ योजना, वांबोरी चारीचे काम पहिल्या टप्प्यात समाधानकारक न झाल्याने आजही अनेक लाभधारक गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. पहिल्या टप्प्यातील कोट्यवधी रूपये खर्च करूनही लाभधारक गावे, शेतकरी या मागील दोन्ही योजनांबाबत असमाधानी आहेत.
मिरी-तिसगाव नळ योजनेसाठी धरणातून शंभर लिटर पाणी उचलले तरी, टेलच्या गावापर्यंत 25 लिटर पाणी पोहोचत असल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनीही मान्य केलेले आहे. तीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी किमान मंजूर करण्यात आलेला 155 कोटी रूपयांचा निधी तरी पारदर्शक कामातून खर्च व्हावा, एवढी माफक अपेक्षा विठ्ठल मुटकुळे, महादेव अकोलकर, राजेंद्र अकोलकर, मच्छिंद्र अकोलकर, राहुल अकोलकर, बाळासाहेब मुखेकर, शंकर आठरे या शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
पाईपलाईन कामाची चौकशी करणार
मिरी-तिसगाव नळ योजने अंतर्गत जुन्या व काही नव्याने समावेश केलेल्या 43 गावांसाठी पांढरीपूल पासून पुढे सुमारे सव्वा तीनशे किलोमीटर नवीन पाईपलाईन खोदून लाभधारक गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी 155 कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. शासन नियमाप्रमाणे पाईपलाईनची खोदाई 75 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. हा नियम डावलून खोदकाम होत असल्यास चौकशी करण्याचे आश्वासन जीवन प्राधिकरणाच्या उपअभियंता मृणाल धगधगे यांनी दिले.
Tags :

