महाराष्ट्र
10175
10
अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाईत 'भेसळ', दुध भेसळप्रकरणी कारवाया 177; गुन्हे मात्र दोनच
By Admin
अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाईत 'भेसळ', दुध भेसळप्रकरणी कारवाया 177; गुन्हे मात्र दोनच
नगर सिटीझन liveटिम प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून दूध भेसळीच्या प्रकरणांनी नगर जिल्हा राज्यात चर्चेत आहे. जिल्हा दूध तपासणी पथकाने मोहीम हाती घेतली असली, तरी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत मात्र 'भेसळ' असल्याची चर्चा आहे.
गेल्या दीड वर्षांत अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या 177 कारवायांमधून केवळ दोनच नमुने भेसळयुक्त आढळले. 24 नमुन्यांमध्ये केवळ पाणी आढळले. शिवाय 134 ठिकाणी केलेल्या कारवायांचा अहवाल क्लीन आल्याने 'अर्थ'शून्य असल्याचे दिसले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न सर्वसामान्याकडून उपस्थित केला जात आहे.
जिह्यात सुमारे 1950 मोठी दूधकेंद्रे (डेअरी) असून, गाव तेथे छोटे-मोठे दूध संकलन केंद्रेही आहेत. या माध्यमातून दररोज 42 लाख लिटर दुधाचे संकलन होते. मुंबई, पुणे, बारामती यासह गुजरातमध्येही नगरच्या दुधाला मागणी आहे. मात्र, काही दिवसांपासून श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव यासह अन्य काही तालुक्यांत अन्न व औषध प्रशासनाने कारवाईची कागदे रंगवली. यातून जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंतच्या कालावधीत संबंधित विभागाने 177 ठिकाणी कारवाया केल्या.
प्रशासनाने कारवाई केल्यानंतर आतापर्यंत त्या त्या ठिकाणाहून 177 दुधाचे नमुने घेतले. जिह्यात दूध तपासणीची आवश्यक प्रयोगशाळा नसल्याने नमुने पुणे, मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्याचा अहवाल एक ते दोन महिन्यांनंतर येतो. त्यात दोषी आढळल्यास पुढील कारवाई केली जाते. जिह्यात 177 कारवाया केल्या. मात्र, यातील केवळ दोनच ठिकाणी दूध भेसळयुक्त आढळल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून आला आहे. त्यामुळे उर्वरित ठिकाणी प्रशासनाला चुकीची खबर मिळाली म्हणून करण्यात आली होती, की कारवाईच्या वेळी घेतलेले नमुने आणि प्रयोगशाळेतील नमुने, यामध्ये काही 'गोलमाल' आहे, याविषयीची वेगवेगळी चर्चा होत आहे.
24 संकलन केंद्रचालकांना दंड!
2022 या वर्षात 112 नमुने घेतले होते. यातील 24 नमुने कमी दर्जाचे आढळले. संबंधितांवर संकलनानुसार 10 हजारांपासून पुढे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातील दोन नमुने भेसळयुक्त, असुरक्षित आढळले. तसेच 2023 या वर्षात आजअखेर 55 कारवाया झाल्या असून, 25 संकलन केंद्रचालकांच्या नमुन्याला क्लीन चिट मिळाली आहे. अजून उर्वरित अहवाल येणे बाकी आहे.
दूध तपासणी समितीची कारवाई सुरूच!
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात एका प्लॅन्टवर जिल्हा दूध तपासणी समितीचे सदस्य सचिव डॉ. गारुडकर, अन्न व औषध प्रशासनाचे पवार, मंडलाधिकारी डोंगरे, तलाठी शिरसाठ यांनी छापा टाकला. यावेळी पाणी तपासणी अहवाल, कर्मचारी मेडिकल अहवालात त्रुटी आढळल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे समजते.
Tags :
10175
10





