वरुर गावात कोरोनाच्या दुसऱ्या बळीने त्यांनी घेतला ' गाव बंद ' चा निर्णय
अहमदनगर- प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील वरुर येथे गेल्या वीस दिवसापासून कोराना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. अवघ्या अठरा दिवसाच्या अंतराने कोरोनाने दुसरा बळी घेतला.
गेल्या अनेक दिवसापासून नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ५० वर्षीय विवाहितेची बुधवारी प्राणज्योत मालवली.
दरम्यान, दोघांच्या मृत्यूमुळे ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर ' गाव बंद 'चा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत वरुर येथे कोरोना संक्रमित ७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.तर, चौघांनी कोरोनावर मात केली असून ते पूर्णतः बरे झाले.
दोघा निष्पापांच्या मृत्यू नंतरही आरोग्य यंत्रणा तितकीशी सक्रिय नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
भगूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गजेंद्र खांबट व स्थानिक आशा वर्कर वगळता वरुरकडे कोणीही फिरकले नाही.
परिणामी, बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती कोरोना टेस्ट करण्यास स्वत:हून पुढे येत नाही. दरम्यान, सरपंच गोपाळ खांबट , ग्रामसेवक शंकर दातीर यांनी स्थानिक पातळीवर स्वयंस्फुर्तीने 'गाव बंद 'चा निर्णय घेतला आहे.
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ठराविक वेळेत उघडी राहतील. हायस्कूल, जि.प.मराठी मुलांची शाळा, सार्वजनिक वाचनालय या आस्थापना पूर्ण बंद राहतील. स्थानिक रहिवाशांच्या रॅपिड अँन्टिजेन टेस्टसाठी किट पुरवण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.