महाराष्ट्र
सत्यजीत तांबेंनी रक्तविरहित क्रांतीने मिळवली उमेदवारी मात्र भवितव्याचे काय
By Admin
सत्यजीत तांबेंनी रक्तविरहित क्रांतीने मिळवली उमेदवारी मात्र भवितव्याचे काय!
राज्यातील विविध प्रसिद्धी माध्यमांची तांबेंच्या निवासस्थानी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
विविध नाट्यमय घडामोडीनंतर नाशिक पदवीधर मतदार संघात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा अधिकृत उमेदवार उभा राहू शकला नाही. भाजपाने सुरुवातीपासून तीन नावांभोवती चर्चा ठेवली असली तरीही प्रत्यक्षात त्यातील एकालाही एबी फॉर्म दिला नाही, तर दुसरीकडे विजयाची पूर्णतः खात्री असतांनाही तांबे कुटुंबाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत काँग्रेस पक्षाने डॉ.सुधीर तांबे यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी देत विधान परिषदेतील आपला एक आमदार गमावला. काँग्रेसच्या विचारांचे पाईक समजल्या जाणार्या घराण्यातूनच असा प्रकार घडल्याने अवघा महाराष्ट्र आज विचारात पडलेला असतांना महत्वकांक्षी युवानेता म्हणून ओळख असलेल्या सत्यजीत तांबे यांनी मात्र रक्तविरहित क्रांती करताना आमदारकी पदरात पाडून घेण्यात यश मिळवले आहे. यातून एकीकडे त्यांचा मनसुबा सफल झाला असला तरीही दुसरीकडे आज मिळालेल्या आमदारकीतून उद्याच्या राजकीय भवितव्याचे काय असा प्रश्नही निर्माण केला आहे. त्यांचा हा निर्णय राज्य काँग्रेससह त्यांचे मामा व काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचीही नामुष्की करणारा ठरल्याने पक्षासोबतच थोरातांची भूमिका काय असेल याकडे आता अवघ्या राज्याचे लक्ष्य लागले आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार असलेल्या काँग्रेससह प्रतिस्पर्धी भाजपानेही शेवटच्या क्षणापर्यंत आपला उमेदवार जाहीर केला नाही. काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर होईल असा अंदाज वर्तविला जात असताना सत्यजीत तांबे यांच्याकडूनही वडिलांऐवजी आपल्यालाच तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न सुरु होते. खरेतर डॉ. तांबे असोत अथवा सत्यजीत तांबे पक्षासाठी दोन्ही नावांना कोणतीही अडचण नव्हती, मग असे असतानाही पक्षाने सत्यजीत तांबे यांनाच उमेदवारी जाहीर करुन आपला हक्काचा मतदार संघ का गमावला असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
सत्यजीत तांबे आज चाळीशीत आहेत. गेल्या 22 वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात आहेत. या कालावधीत त्यांनी युवक काँग्रेसच्या प्राथमिक पदापासून प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत संघटनात्मक तर दोनवेळा जिल्हा परिषद सदस्य व 2014 साली अहमदनगर शहर मतदार संघातून विधानसभा निवडणुकही लढवली आहे. भविष्यात आपल्याला वडिलांचा पदवीधर मतदारसंघ अथवा मामांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघ मिळेल या आशेवर त्यांनी प्रचंड राजकीय महत्त्वकांक्षा असतानाही त्याला आवर घातला. मात्र गेल्या काही वर्षांपासून आपले मामा बाळासाहेब थोरात यांच्याकडून सुरु असलेल्या काही गोष्टी त्यांनी हेरल्यानेच गुरुवारी त्यांनी केलेली कृती समर्थनीय ठरते असे मत आता त्यांच्या निकटतम वर्तुळातून समोर येवू लागले आहे.
राज्याला धक्का देणार्या या घडामोडीनंतर सत्यजीत तांबे यांनी आपण काँग्रेसचेच उमेदवार असून पक्षाने आपणास अथवा वडिलांना उमेदवारी करण्याची मुभा दिली होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या नावाचा एबी फॉर्म पोहोचला नाही, त्यामुळे आपल्याला अपक्ष उमेदवारी करावी लागल्याचे सांगितले. मात्र त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र हा विश्वासघात असून काँग्रेसने राष्ट्रीय अध्यक्षांच्या परवानगीने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. परंतु त्यांनी आपली उमेदवारीच दाखल न केल्याने हा पक्षासोबत विश्वासघात झाल्याचे सांगत शिस्तभंगाच्या कारवाईचाही पुरस्कार केला.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा कौतुकाचा वर्षाव करीत त्यांना गळाला लावले, मात्र ऐनवेळी तांबे यांनी 2018 साली महागाई विरोधातील आंदोलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासल्याचा प्रकार भाजपामधील काहींनी समोर आणून सत्यजीत तांबे यांना भाजपाची उमेदवारी देण्यास विरोध दर्शविला. त्यामुळेच तांबे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेत भाजप पक्षप्रवेश टाळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यासोबतच खुद्द बाळासाहेब थोरात यांनीही सत्यजीत तांबे यांना भाजपाची अधिकृत उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपातील एका ‘बड्या’ नेत्याला फोन केल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला घरातूनच विरोध असल्याचे बोलले जात आहे.
आज नाही तर कधीच नाही असे म्हणत सत्यजीत तांबे यांनी स्वपक्षाविरोधात केलेल्या बंडानंतर पक्षाने ते आमचे उमेदवार नसल्याची भूमिका जाहीर केल्याने त्यांना निवडून येण्यासाठी आता भाजपाच्याच ओंजळीने पाणी प्यावे लागणार आहे. त्याबदल्यात भाजप त्यांचा कसा वापर करुन घेईन याकडे आता राज्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष्य लागले आहे. गुरुवारी उमेदवारी दाखल केल्यापासून डॉ. सुधीर तांबे व सत्यजीत तांबे हे दोघेही अज्ञातवासात आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींनी वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यातील अनेक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी ‘लाईव्ह यूनिटसह’ सकाळपासूनच इंदिरानगरच्या गल्ली क्रमांक एकमध्ये तळ ठोकून आहेत, मात्र त्यांना अद्यापही त्यांच्याशी संवाद साधता आलेला नाही.
एकंदरीत भाजपाने टाळलेला थेट प्रवेश, काँग्रेसने आमचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे होते, सत्यजीत तांबे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याशी आमचा संबंध नाही अशी घेतलेली भूमिका, तांबे पिता-पुत्राच्या बंडखोरीने बाळासाहेब थोरातांसह राज्य काँग्रेसची झालेली नाचक्की, त्यातून शिस्तभंगाच्या कारवाईच्या उंबरठ्यावर पोहोचलेले तांबे पिता-पुत्र अशा स्थितीत सत्यजीत तांबे यांचे राजकीय भवितव्य काय असेल याबाबत सध्या राज्यभर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
Tags :
27061
10