महाराष्ट्र
07-Mar-2025
महाराष्ट्रात वार्षिक परीक्षा ८ ते १२ एप्रिलदरम्यान ठेवा; मुख्याध्यापक महामंडळाची मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने संकलित चाचणी दोन/वार्षिक परीक्षेचे दि. २५ एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक तयार केले आहे. शेवटचा पेपर दि. २५ ला ठेवला आहे. त्यानंतर चार ते पाच दिवसांत उत्तरपत्रिका तपासणे, संकलित निकाल तयार करणे, प्रगती पुस्तके लिहिणे, संचयी नोंदपत्रक लिहिणे आदी कामे चार ते पाच दिवसांत होऊ शकत नाहीत.त्यामुळे इयत्ता पाचवी ते नववीसाठीच्या संकलित मूल्यमापन चाचणी (पॅट) परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून ही परीक्षा दि. ८ ते १२ एप्रिलदरम्यान ठेवावी, अशी मागणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे केली आहे. तसे निवेदनही महामंडळाने 'एससीईआरटी'च्या उपसंचालक कमलादेवी आवटे यांना गुरुवारी दिले.राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन केले आहे. त्यानुसार २०२४-२०२५ मध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी एक झालेली आहे. संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने जाहीर केले आहे. संकलित चाचणी २ आणि वार्षिक परीक्षेचे दि. २५ एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक तयार करून पाठविले आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या म्हणण्यानुसार, माध्यमिक शाळेत विषयनिहाय शिक्षक असतात. एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी आणि किमान पाच विषयाचा कार्यभार त्यानुसार ३५० ते ४०० उत्तरपत्रिका चार ते पाच दिवसांत तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही. यातच मराठवाडा, विदर्भ व इतर जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये कडक ऊन, पिण्याच्या पाण्याची टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करून एवढ्या उशिरापर्यंत परीक्षा ठेवणे योग्य होणार नाही. प्रत्येक वर्षी १० ते १२ एप्रिलपर्यंत परीक्षा संपते. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामाबरोबरच उपचारात्मक अध्यापन, सुंदर हस्ताक्षर वर्ग, चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, पोहणे आदी विविध कलाकौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी शाळेमध्ये छंदवर्गाचे आयोजन केले जाते. दि. २५ एप्रिलपर्यंत परीक्षा ठेवल्याने हे वर्ग घेता येणार नाहीत. त्यामुळे वेळापत्रकात बदल करून 'पॅट'ची परीक्षा दि. ८ ते १२ एप्रिलदरम्यान घेण्यात यावी. त्यापूर्वी शाळेला इतर विषयांची परीक्षा घेण्याची परवानगी शाळास्तरावर द्यावी, ही विनंती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि सचिव नंदकुमार सगर यांनी केली आहे.