पाथर्डी- जवखेडे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा व जवखेडे दुमाला येथे दोन महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातारण आहे.
दोन महिन्यांपूर्वी विष्णू थोरात यांची सात हजार रुपयांची चोरी झाली. तेव्हापासून चोर्यांचे सत्र चालूच आहे. त्यानंतर विजय जाधव, सचिन नेहूल, गौतम नेहूल, बबन नेहूल यांच्या वस्त्यांवर चोरटे गेले होते. परंतू त्यांची डाळ शिजली नाही. जवखेडे सोसासटीचे संचालक बाबासाहेब मतकर, नितीन जाधव, हमीद सय्यद यांचे वीजपंप विहिरींमधून चोरीस गेले. बहुतेक शेतकर्यांकडे कापसाचे पीक होते.
बर्याच शेतकर्यांचा शेतात उभा असलेला कापूस रात्रीतुन चोरट्यआंनी वेचून नेल्याचे प्रकार घडले आहेत. यामध्ये विठ्ठल आंधळे, हिराजी आंधळे, अजित नेहूल, परशुराम खेडकर याच्यांसह अनेक शेतकर्यांच्या कापसाची चोरी झाली आहे.जवखेडचे रहिवासी व नगर कॉलेजचे ग्रंथपाल मायकल जाधव यांचे बंद घराचा चोरट्यांनी कूलूप कोयंडा तोडला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा सत्यवान जाधव, अरविंद जाधव, जालिंदर वाघ यांच्या घराकडे वळविला. परिसरात शेतीची औजारे, घरासमोर असलेल्या वस्तू, कोंबड्या, शेळ्याच्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात पाथर्डी पोलिसांनी लक्ष घालावे व या चोर्यांना आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
वस्तीवर राहणार्यांनी चोरटे आल्याची माहिती पोलिसांना संपर्क करून द्यावी. तसेच एकमेकांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून धीर देण्याची गरज आहे. या भुरट्या चोरट्यांसंदर्भात पाथर्डीच्या पोलिस निरीक्षकांनी निवेदन देऊन गावामध्ये रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी करणार आहोत.
– अॅड. वैभव आंधळे, ग्रा. पं. सदस्य