तालिबानचं नागपूर कनेक्शन? दहा वर्षे नागपुरात राहणारा ‘तो’ तालिबान्यांमध्ये सामिल झाल्याचा संशय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अफगाणिस्तानवर कब्जा करत तालिबाननं २० वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तालिबानी दहशतवाद्यांचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. त्यातला एक दहशतवादी दोन महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये बेकायदेशीरपणे राहत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याच्या आरोपाखाली दोन महिन्यांपूर्वी नूर मोहम्मद नावाच्या अफगाणी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना अफगाणिस्तानला पाठवून दिलं. तोच नूर मोहम्मद तालिबानीच्या एका तुकडीसोबत हातात बंदूक घेऊन उभा असल्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.
विशेष म्हणजे, पोलिसांनी नूर मोहम्मदला ताब्यात घेतलं होतं, तेव्हा त्याच्या मोबाईल फोनमध्ये काही तालिबानी व्हिडीओ आढळले होते, तसेच तो काही तालिबानी नेत्यांचे ट्विटर फॉलो करत असल्याचंही पोलिसांना आढळलं होतं. तेव्हा नूरच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीचे व्रण दिसून आले होते. मात्र, नंतर नागपूर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत नूर मोहम्मदनं नागपुरात कुठलेही बेकायदेशीर कृत्य केलं नसल्याचं लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेत त्याला परत पाठविलं होतं.
या संदर्भात आज पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना विचारले असता, ते म्हणाले की, नूर मोहम्मदला अफगाणिस्तानला परत पाठवल्यानंतर तो काय करतोय? हे जाऊन घेण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही. धक्कादायक म्हणजे, नूर मोहम्मद सुमारे 10 वर्षांपूर्वी मेडिकल टुरिस्ट वीजावर भारतात आला होता. त्यानंतर तो मुदत संपल्यावर मायदेशी परत गेला नव्हता. आणि बेकायदेशीररित्या सुमारे दहा वर्ष नागपुरात वास्तव्यास होता, या दरम्यान त्यानं कुठं रेकी केली का? नागपुरात कोणत्या उद्दिष्टाने थांबला होता? तो इथं कोणावर नजर ठेवून होता का? असे अनेक प्रश्न सध्या ही अनुत्तरित आहेत.