रेशन दुकानाकडे दोषी असुनही पुन्हा त्याच व्यक्तीकडे चाव्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दीड वर्षापूर्वी रेशनच्या अन्नधान्य साठ्यात तफावत आढळून आल्याने, शेवगाव तालुक्यातील वरखेड येथील दुकानदारास दोषी ठरविण्यात आले. मात्र, मोठा कालावधी उलटल्यानंतरदेखील कोणतीच कारवाई न करता त्या व्यक्तीकडेच दुकान देण्यात आले.
वरखेड येथे कूपन क्रमांक ७५ आहे. त्या दुकानदाराकडे दिवटे व खरडगाव या गावांतील अनुक्रमे १६ व १०५ क्रमांकाची दुकाने तात्पुरत्या स्वरूपात चालविण्यास दिली होती. त्यांची मे २०२० मध्ये पडताळणी केली असता, ६१ क्विंटल गहू, तसेच ३७.४४ क्विंटल तांदूळ, असा एकूण ९८.४४ क्विंटल अन्नधान्य साठा कमी आढळला. याप्रकरणी दुकानदार भगवान तेलोरे यांच्या विरोधात शेवगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, वरखेड येथील दुकानाचा परवाना रद्द करण्यासंदर्भात शासकीय पातळीवर कागदोपत्री हालचाली करण्यात आल्या. मात्र, दीड वर्षाचा कालावधी लोटूनदेखील वरखेड येथील दुकानावर नव्याने नेमणूक किंवा इतरांना ते जोडले नाही.
त्यामुळे दोषी आढळूनदेखील रेशनच्या चाव्या दोषीकडेच ठेवण्यात आल्याने, सर्वसामान्य जनतेमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.धान्यसाठ्यातील तफावतीपासून आतापर्यंतच्या कालावधीत दुकानदारांकडून वाटण्यात आलेल्या अन्नधान्याचा तपशील दोन दिवसांत वरिष्ठांना सादर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
एस. सी. चव्हाण,पुरवठा निरीक्षक, शेवगाव