श्री क्षेत्र देवगड संस्थान येथे होणार रेल्वेस्थानक;नगर जिल्ह्याच्या वैभवात होणार भर
अहमदनगर- प्रतिनिधी
औरंगाबाद - नगर - पुणे रेल्वे सर्वेक्षणास सुरुवात श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट देऊन श्री दत्तप्रभू तथा किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेत संपूर्ण देवालय परिसराची पाहणी केली.
औरंगाबाद - नगर - पुणे रेल्वे मार्गा बाबत श्री गुरुदेव दत्त पीठाचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांशी प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली, याप्रसंगी महाराजांनी देखील रेल्वे मार्ग होणे किती आवश्यक आहे, यामुळे लोकांना कसा फायदा होईल ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सुरेशचंद्र जैन व मुकेश लाल यांचेशी महाराजांनी चर्चा केली.
श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे प्रतिनिधी म्हणून सोमवारी खासदार भागवत कराड रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत औरंगाबाद येथे बजरंग विधाते यांनी संवाद साधत या प्रकल्पावर चर्चा करून देवगड भेटीचे संबंधितांना निमंत्रण दिले होते.
बहुचर्चित असलेला रेल्वे मार्ग म्हणजे औरंगाबाद-नगर-पुणे, हा व्यापारी उद्योजक शेतकरी पर्यटक यांचेसाठी उपयोगी तथा व्यावहारिकदृष्ट्या परवडणारा वेळेची व पैशाची बचत करणारा रेल्वेमार्ग,अनेक दिवसांची प्रवासी,लोकप्रतिनिधी,उद्योजक,व्यापारी,शेतकरी यांची मागणी आता कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहे.
औरंगाबादेतून सुरू होणारा हा रेल्वे मार्ग गंगापूर- श्रीक्षेत्र देवगड संस्थान-नेवासा-शनिशिंगणापूर मार्गे नगर असा जातो,या मार्गामुळे जालना,शेंद्रा,वाळुज,नगर या औद्योगिक वसाहतींचा माल ने आण करण्यासाठी सुलभता प्राप्त होईल, औद्योगिक क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रातील शेती मालास मुख्य बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी हा मार्ग आवश्यक असा आहे.