महाराष्ट्र
राष्ट्रीय महामार्ग कामाला येणार वेग, भूसंपादनाची प्रक्रियाही पूर्ण
By Admin
राष्ट्रीय महामार्ग कामाला येणार वेग, भूसंपादनाची प्रक्रियाही पूर्ण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम) साठी भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकर्यांना ऑनलाईन रकमेचे वाटप करण्यात आले.
यामुळे तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन जमिनी ताब्यात घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग येईल.
त्यामुळे चार वर्षांपासून रखडलेले काम लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डीचे उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांच्या दालनात नुकतीच महामार्गासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकर्यांची बैठक झाली.
कागदपत्रांची पूर्तता झालेल्या शेतकर्यांच्या बँक खात्यावर भूमिराशी पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने भूसंपादनाच्या मोबदल्याची रक्कम अदा करण्याची प्रक्रिया पार पडली.जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात प्रथमच अशा प्रकारची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अभय राखाडे, नायब तहसीलदार आर. एम. ससाणे, अव्वल कारकून नितीन बनसोडे, संगणक सहाय्यक अविनाश काळोखे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
एकूण 28 गटांतील शेतकर्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येणार असून, त्यापैकी 7 गटातील शेतकर्यांना भूसंपादनाची रक्कम यावेळी देण्यात आली. या मोहिमेअंतर्गत 4 कोटी 26 लाख 52 हजार 618 रुपयांपैकी 95 लाख 63 हजार 772 रुपयांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, शेतकर्यांच्या बँक खात्यात भूसंपादनाची रक्कम जमा झाल्याने लवकरच या महामार्गाच्या कामाला गती येणार आहे.
काम वेगाने सुरू होणार : राखाडे
भूसंपादन प्रक्रियेतील संबंधित शेतकर्यांना रक्कम दिल्याने, तातडीने भूसंपादन करून जमिनी ताब्यात घेऊन राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागणार आहे. भूसंपादनामुळे रखडलेले रस्त्याचे काम वेगाने चालू होईल, अशी अपेक्षा आहे. उर्वरित शेतकर्यांचा भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्पयात आहे, असे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अभय राखाडे यांनी सांगितले.
Tags :
813
10