महाराष्ट्र
स्टोन क्रशरची 14 लाखाचि वीजचोरी; क्रशरच्या मालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल
By Admin
स्टोन क्रशरची 14 लाखाचि वीजचोरी; क्रशरच्या मालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
वीज मीटरच्या मूळ जोडणीमध्ये छेडछाड करून एकूण 91 हजार 252 विद्युत युनिटस म्हणजेच 14 लाख 84 हजार 180 रुपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यात उघडकीस आला आहे.
महावितरणने दिलेल्या फिर्यादीवरून क्रशरचे मालक सुनील गंगाधर आहेर यांच्या विरुद्ध घारगाव पोलीस स्टेशनला भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या नाशिक परीमंडलाच्या नगर मंडळ अंतर्गत असलेल्या संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील बालाजी स्टोन क्रशर या खडी क्रशरच्या वीजजोडणीची महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाने तपासणी केली असता ही वीज चोरी उघडकीस आली.
संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील बालाजी स्टोन क्रशर या खडी क्रशरच्या ठिकाणी दिलीप लक्ष्मण चिखले या नावाने थ्री फेज वीजजोडणी दिलेली असून सुनील गंगाधर आहेर हे या खडी क्रशरचे मालक आहेत. सदर ठिकाणी तपासणीसाठी महावितरणचे भरारी पथक गेले असता वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरबदल करून या खडी क्रशरच्या ठिकाणी विजेची चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आले. यात एकूण 91 हजार 252 विद्युत युनिटची म्हणजे एकूण 14 लाख 84 हजार 180 रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. महावितरण नाशिकच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार विजय पवार यांनी घारगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सदर खडीक्रशरचे मालक सुनील गंगाधर आहेर यांच्या विरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार पवार, कनिष्ठ अभियंता डी.जी. पंडोरे, वरिष्ठ तंत्रज्ञ एस. एस. जाधव व यु. इ. बागडे यांनी ही कारवाई केली. वीज चोरांविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली असून बेकायदेशीरपणे वीज वापर करणारे महावितरणच्या रडारवर आहेत. विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 व 138 नुसार वीजचोरी करणाऱ्याला कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही क्लृप्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करू नये, तसेच आकडे टाकून वीजचोरी करणे थांबवून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. विजेचा अनधिकृत वापर टाळून संभाव्य कायदेशीर कारवाईपासून दूर राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
Tags :
597
10