महाराष्ट्र
627
10
पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात अवैध धंद्यांविरोधात महिलांचा यल्गार
By Admin
पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात अवैध धंद्यांविरोधात महिलांचा यल्गार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मढी येथे मटका, जुगार, मावा व दारूची विक्री जोरात होत आहे. याविरोधात येथील महिलांनी एल्गार पुकारला असून, येत्या आठ दिवसांत या अवैध धंद्यांना राज्य उत्पादन शुल्क विभाग, ग्रामपंचायत व पोलिसांनी आळा घालावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महिलांनी ग्रामसभेत दिला.
महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत सरपंच व ग्रामसेवकाला निवेदन दिले. अखेर ग्रामसभेमध्ये मढी येथील अवैध धंदे बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मढी येथे महिलांच्या पुढाकारातून मटका, जुगार व दारूबंदीसह अवैध धंदे बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
मंगळवारी (दि.16) मढी येथे महिला ग्रामसभा पार पडली. मढी देवस्थानच्या माजी विश्वस्त तथा ग्रामपंचायत सदस्य ज्योती मरकड अध्यक्षस्थानी होत्या. पोलिस प्रशासन व ग्रामपंचायतीकडून कारवाई होत नसेल, तर आम्ही दंडुके हातात घेऊन अवैधरित्या चालत असलेले धंदे बंद पाडून मद्यपींची धुलाई करू. येत्या आठ दिवसांत बेकादा मटका, दारू विक्रीला राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी आळा घालावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महिलांनी ग्रामसभेत दिला.
सुवर्णा मरकड म्हणाल्या, मद्यपींचा महिलांना व गरीब कुटुंबांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दारू व मटका व जुगाराच्या आहारी गेले आहेत. दारूमुळे घरगुती हिंसाचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. दारुविक्रीमुळे गावातील शांतता बिघडली आहे. यावर ग्रामपंचायत व पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी. महिला बचत गटाच्या समन्वयक सुवर्णा मरकड, ग्रामपंचायत सदस्या ज्योती मरकड, अर्चना मरकड यांनी पुढाकार घेऊन गावातील महिलांना एकत्र करून दारूबंदीचे निवेदन सरपंच संजय मरकड व ग्रामसेवक विठ्ठल राजळे यांना देण्यात आले.
यावेळी वैशाली मरकड, सुनंदा मरकड, योगीता मरकड, मंदाबाई मरकड, विजूबाई मरकड, आश्विनी मरकड, मीराबाई मरकड, मंदा धायतडक, आश्राबाई मरकड, तस्लीम शेख, माजी सरपंच देविदास मरकड, शरद कुटे, छाया वायकर, गणेश पाखरे, अनिरुद्ध मरकड, फिरोज शेख, ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान पाखरे आदी उपस्थित होते. ग्रामसभा झाल्यानंतर महिलांतर्फे घोषणा देत मढी येथील अवैध धंद्यांविरुद्ध गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी सरपंच संजय मरकड म्हणाले की, मढी येथील दारुविक्रीकडे राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गावातील अवैध धंद्यांविरोधात महिलांनी घेतलेल्या पुढाकाराला ग्रामपंचायत व आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. मद्यपींकडून कोणत्याही महिलेला त्रास झाल्यास पाथर्डी पोलिस ठाणे व माझ्याशी संपर्क करा, तुम्हाला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी ग्रामसभेत दिले.
नाही तर मद्यपींचा धुलाई
मढी येथील अवैध मटका व दारूविक्री ग्रामपंचायत व पोलिसांनी पूर्णपणे बंद करावी, न केल्यास दंडुके हातात घेऊन अवैधरीत्या चालवणार्या हॉटेलचालक व मद्यपींचा धुलाई करण्याचा इशारा सुनंदा मरकड दिला.
व्यसनी व्यक्ती आपल्या मुलाबाळांना, पत्नीला व आई-वडिलांना मारहाण करून घरातील धान्ये व भांडी विकून आपल्या संसाराची वाट लावत आहेत. त्यामुळे मढी गावातील मटका जुगार व अवैध दारू विक्री तात्काळ कायमची बंद करून महिलांना, ग्रामस्थांना न्याय मिळून द्यावा.
ज्योती मरकड, ग्रामपंचायत सदस्या.
Tags :

