शनी दरबारात नव्या यंत्राचा उगम; ग्राहकाकडून मनमानी रक्कम वसूल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शनैश्वर देवस्थान ट्रस्टने पूजासाहित्यातील यंत्र व पादुकांवर बंदी आणल्यानंतर आता नवनवीन यंत्रांचा वापर सुरू झाला आहे. व्यावसायिकांनी 'कमाई'ला कात्री लागल्याने नवनवीन यंत्राची पूजेच्या ताटात घुसखोरी सुरू केली आहे.मागील आठवड्यात मुंबईतील एका शनिभक्ताच्या तक्रारीनंतर देवस्थान ट्रस्टने पूजेच्या ताटातील नवग्रह यंत्र, शनियंत्र, पादुका आणि शिक्का मंदिरात नेण्यास बंदी घातली होती.
भाविकांच्या हिताचा हा निर्णय दुकानदारांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यांच्या धंद्यावर परिणाम होऊ लागल्याने गावात नवनवीन फंडा सुरू करण्यात आला आहे.
शनिवार व रविवारी झालेली भक्तांची गर्दी लक्षात घेऊन दुकानदारांनी बंदी असलेले यंत्र बाजूला ठेवून नवीन यंत्र देण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत शंभरहून अधिक भाविकांनी दुकानदार सक्ती व दादागिरी करत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
देवस्थान वाहनतळ वगळता गावातील सर्वच खासगी वाहनतळांत पूजेच्या साहित्यावरुन तक्रारी वाढल्या आहेत. देवस्थानने महाद्वार परिसरात बंदोबस्त वाढविला असून, पूजेच्या ताटातील कुठलेच यंत्र मंदिरात जाणार नाही, याकरीता सुरक्षा विभाग सतर्क आहे, असे सुरक्षाअधिकारी संभाजी बोरुडे व गोरख दरंदले यांनी सांगितले.
नव्या यंत्रांसाठी मनमानी दर
दुकानदारांनी आता नवीन सिद्ध शनिकवच, बगलामुखी यंत्र, कनकधारा यंत्र, इच्छापूर्ती कछुआ, वस्तुनाशक यंत्र, गायत्री यंत्र पूजेच्या ताटात देण्यास सुरुवात केली आहे. या वस्तू वापरुन मनमानी रक्कम वसूल केली जात आहे.