महाराष्ट्र
थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करा: महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकांचा इशारा
By Admin
थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करा: महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकांचा इशारा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कोळसा व वीज टंचाईच्या काळात सुद्धा सूक्ष्म नियोजन करून आवश्यक ती वीज विकत घेवून महावितरण महाराष्ट्रातील सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करीत आहे.
मात्र पुरवठा केलेल्या प्रत्येक युनिटचे पैसे ग्राहकांकडून दरमहा वसूल झाले नाही तर वीज निर्मिती कंपन्यांना पैसे देऊ न शकल्यास परिणामी ग्राहकांना अखंडित वीज सेवा देणे शक्य होणार नाही. त्यामुळे दरमहा सर्वच वर्गवारीतील ग्राहकांकडून थकबाकी वसूल करा अन्यथा थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करा. थकबाकी वसुलीमध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे(भाप्रसे) यांनी दिला .
ते राहुरी येथील कृषी विद्यापीठ आवारात असलेल्या सभागृहात अहमदनगर मंडळातील सर्व अभियत्यांची व अधिकाऱ्यांची आढावा बैठक मंगळवारी दि. १७ मे २०२२ रोजी घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, अधिक्षक अभियंता सुनिल काकडे व्यासपीठावर उपस्थित होते. कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे पुढे बोलतांना म्हणाले की, ग्राहकांना दरमहा त्यांनी वापरलेल्या विजेचे देयक मीटर रीडिंग च्या माध्यमातून वाचन करून अचूक, योग्य व वेळेत देण्यासाठी मीटर एजन्सीं नेमण्यात आलेल्या आहेत. या एजन्सींना मीटर वाचन करताना फोटोंचा दर्जा सुधारण्यास आणखी अचूक काम करण्यास सांगितले सांगितले आहे, मात्र या महिन्यात कार्यक्षमता न सुधारल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. संबंधित एजन्सींच्या कामगिरीसाठी आणि बिलिंगच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी उपविभागीय अभियंते व कार्यकारी अभियंते यांना जबाबदार धरण्यात येईल. कंपनी चालविण्यासाठी दरमहा आवश्यक
असणारा महसूल गरजेचा असून त्यासाठी विकलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटचे थकबाकीसह दरमहा वीज बिल वसूल झालेच पाहिजे अन्यथा अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देशही सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले. यावेळी महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी सुद्धा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून अहमदनगर मंडळातील विविध विषयाचा आढावा घेऊन या महिन्यात आणखी गतिमानतेने कार्य करण्याचे आवाहन केले. बैठकीला अहमदनगर मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी व मीटर रिडींग एजेन्सीचे कर्मचारी उपस्थित होते.
Tags :
28116
10