पाथर्डी- 'या' गावातील रस्ता खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शासनाच्या फंडातून पैसे खर्चून तयार केलेला रस्ता हा त्वरित खुला करावा या मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील मांडवे गावातील ग्रामस्थांनी पाथर्डी तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू केले.
याबाबत सायंकाळपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे उपोषण सुरूच होते.
मांडवे येथील अनेक वस्त्यांवर तेथील ग्रामपंचायतीने सहा लाख रुपये खर्चून केलेला रस्ता गावातीलच काही नागरिकांनी बंद केला आहे. हा रस्ता तातडीने खुला करून द्यावा, या मागणीसाठी मंगळवारी (दि. 12) सकाळपासून ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
मांडवेतील शिंदेवस्ती, निर्मळवस्ती, गावडेवस्ती व नजणवस्तीवर मांडवे ग्रामपंचायतीने सहा लाख रुपये खर्चून रस्ता केला. काही लोकांनी रस्ता अडवल्याने या वस्त्यांवर जाणार्या लोकांना याचा उपयोेग होत नाही. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर काटे व झाडेझुडपे टाकून रस्ता बंद केल्याने या वस्तीवर राहणार्या नागरिकांना घरी जाताना लांबच्या रस्त्याने जावे लागत आहे. हा रस्ता तातडीने खुला करावा या मागणीसाठी वस्तीवरील ग्रामस्थ विठ्ठल निर्मल, विजय निर्मल, मल्हारी देशमुख, परमेश्वर देशमुख, पोपट नजन, विजय गावडे, नारायण भाकरे, नारायण निर्मळ आदींनी हा रस्ता खुला करून मिळावा यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.