महाराष्ट्र
नातवाच्या हल्ल्यात आजोबासह चौघे जखमी
By Admin
नातवाच्या हल्ल्यात आजोबासह चौघे जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
लग्न होऊन अनेक वर्षे झाली, तरी मला मूळबाळ होत नाही. आता तुमच्याकडे बघतोच, असे धमकावत नातवाने चक्क आजोबावरच कोयत्याने सपासप वार केले.
त्यात आजोबा गंभीर जखमी झाले. जखमी आजोबाला वाचविण्यास आलेल्या चुलता, भाऊ आणि चुलतीलाही या माथेफिरू नातवाने गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नारायणवाडी (ता. नेवासा) येथे घडली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नारायणवाडी (ता.नेवासा) येथील गोकूळ मधुकर क्षीरसागर हा रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घराच्या दरवाजासमोर कोयता मारत होता. त्यामुळे आजोबा जालिंदर मुकिंदा क्षीरसागर यांनी त्याला तू दरवाजावर कोयता का मारतो? अशी विचारणा केली. त्यावर संतप्त झालेल्या नातवाने लग्नाला इतकी वर्ष झाले तरी मूलबाळ होत नाही, आता तुमच्याकडे बघतोच, तुम्हाला जीवे मारूनच टाकतो, असे धमकावत आजोबा जालिंदर मुकिंदा क्षीरसागर यांच्या तोंडावर कोयत्याचे वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले.
यावेळी गोकूळकडून सुटका करून घेण्यासाठी चुलते बाबासाहेब जालिंदर क्षीरसागर, चुलती स्वाती बाबासाहेब क्षीरसागर आणि चुलत भाऊ विश्वास बाबासाहेब क्षीरसागर मध्यस्थी करण्यास धावले. गोकूळने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. कोयत्याच्या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात आरोपी गोकूळ क्षीरसागर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपीस तीन दिवसांची पोलिस कोठडी
घटनेची माहिती मिळताच नेवाशाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी आरोपी गोकूळ क्षीरसागर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. नेवासा येथील न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती त्यांनी दिली.
Tags :
57191
10