महाराष्ट्र
7420
10
शेवगाव बनले मावा नगरी !
By Admin
शेवगाव बनले मावा नगरी ! मराठवाड्यापर्यंत शेवगावच्या सुपारीचे नेटवर्क पसरले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सुगंधी सुपारी व मावा तयार करण्यासाठी सुपारी काडंप मशीन आणि गोडाऊनमुळे शेवगाव शहर व तालुक्याची नवी ओळख निर्माण होत आहे.
जिल्ह्यासह राज्यातील काही भागात विशेषतः मराठवाड्यापर्यंत शेवगावच्या सुपारीचे नेटवर्क पसरले असताना पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा, मात्र मूग गिळून गप्प बसलेली दिसून येते. गुटखा सुपारीचा साठा, पुरवठ्यातून दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याने संबंधित यंत्रणा तरुणांच्या आरोग्याशी खेळत आहे.
शहरासह तालुक्यातील गावांगावात वर्दळीच्या ठिकाणी वसलेल्या अनेक पानटपर्या केवळ गुटखा, मावा विक्रीच नव्हे, तर गुन्हेगारी हालचालींचे केंद्र बनू लागल्या आहेत. त्यातून तरूण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. मावा तयार करण्यासाठी लागणारी सुपारी कांडप करून तालुक्यातील प्रमुख गावात, जिल्ह्यात व विशेषतः मराठवाड्यातील काही भागात पोहचवली जाते. त्यादृष्टीने शहरातील मध्यवर्ती भागात अशा कांडप गिरण्या आणि गोडाऊन तयार झाले आहेत. आजघडीला 10-12 काडंप गिरण्या कार्यरत आहेत. पुरवठा नेटवर्क जबरदस्त आणि विखुरलेले असल्याने येथे कांडप केलेल्या सुपारीला खूप उठाव असल्याचे दिसून येते.
शहरातील प्रत्येक रस्त्यावर व गल्लीबोळात तसेच ग्रामीण भागात मावा विक्रीच्या टपर्या राजरोसपणे सुरू आहेत. यावर अन्न भेसळ प्रशासन, पोलिसांचे अजिबात नियंत्रण नाही. सहज उपलब्धतेमुळे अनेक तरूण, शाळकरी मुले या व्यसनाचे बळी पडत आहेत.
काही जण कर्करोगाच्या विळख्यात सापडून अखेरच्या घटका मोजत आहेत. या व्यसनात प्रामुख्याने रिक्षाचालक, बांधकाम कामगार, मजूर, विद्यार्थी आदींचा समावेश आहे. तरुणाईमध्ये माव्याचे वाढते प्रमाण चिंताजनक पातळीवर आहे.
लाखो रुपयांच्या उलाढालीमुळे अनेकांना या व्यवसायाच्या रुपाने सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाली आहे. त्यामुळे हात ओले होण्यासाठी अधिकारी छापा टाकण्याचा बनाव करतात. अनेकदा कारवाई होऊनही हा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात व त्याची पाळेमुळे खणण्यात संबंधित विभागास यश आलेले नाही. त्यामुळे यातील बड्या हस्तींचा वावर सहज लक्षात आल्याने सहजासहजी या व्यवसायीकांच्या वाट्याला जाण्याचे धाडस कोणीही करत नाही.
शहरात गुन्हेगारींचा अड्डा
गुठका विक्रीच्या आडून शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढला आहे. शहरातील शांतता, कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. माव्याबरोबर हिरा, विमल असा परराज्यातून येथे ठराविक ठिकाणी गुटखा पोहोच होतो. तेथून त्याचे पान टपर्यांवर दुचाकी वाहनाद्वारे विक्रीसाठी वितरण केले जाते.
मराठवाड्यात विखुरले जाळे
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यापर्यंत याचा पुरवठा साखळी पोहचली आहे. तर, चारचाकी वाहने दिमतीला असल्याने अल्पवयीन मुले देखील पैशाच्या मोहापायी या व्यवसायात येऊन व्यसनाचे शिकार झाले आहेत.
उपचारासाठी नाक, कान, घसा तज्ज्ञांकडे
शेवगावचा मावा फेमस आहे. माव्याने तोंडाचा कॅन्सर होतो. या आजाराचे प्रमाण वाढते आहे. माव्यामुळे बाधित झालेला रुग्ण शक्यतो उपचारार्थ नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉक्टरकडे उपचारासाठी जातात, अशी माहित ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर काटे यांनी दिली.
Tags :

