संघर्ष योद्धा माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे काळाच्या पडद्याआड
पाथर्डी - प्रतिनिधी
संघर्ष योद्धा असा परिचय असलेले माजी केंद्रीय मंत्री बबनराव दादाबा ढाकणे (वय ८७) यांचे निधन झाले. मागील आठवड्यात त्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने अहमदनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज (शुक्रवारी) (ता.२७) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांचे ते वडील होत. ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर, १९३७ रोजी पाथर्डी तालुक्यातील अकोला गावात झाला. ते बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलातर्फे नवव्या लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतला होता. बबनराव ढाकणे हे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर सिंह यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधन मंत्री होते.