महाराष्ट्र
11668
10
जिल्हाबॅंकेच्या नोकरभरतीला "सहकार'ची मंजुरी
By Admin
जिल्हाबॅंकेच्या नोकरभरतीला "सहकार'ची मंजुरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत सत्तांतर झाल्यानंतर लगेचच राज्य सरकारच्या सहकार विभागाने नोकरभरती करण्यास मंजुरी दिली असून, सरकारने दिलेल्या दोन संस्थांमार्फतच ही भरती प्रक्रिया करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मात्र, या संस्था सरकारच्या नोकरभरतीमध्ये व्यस्त असल्याने जिल्हा बॅंकेच्या नोकरभरतीला किती कालावधी लागणार याबाबत प्रश्नचिन्हच उभे राहिले आहे. सुमारे 700 पदे भरण्यास ही परवानगी देण्यात आली आहे.
लिपिकांच्या 700 जागा भरण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, या जागा भरण्यासाठी जिल्हा बॅंकेला नोकरभरती प्रक्रिया राबविणाऱ्या सरकार नियुक्त संस्थेकडून जिल्हा बॅंकेच्या नोकरभरतीच्या प्रक्रियेला सहमती दर्शविली नाही. त्यामुळे कर्मचारी भरतीला परवानगी मिळाली, मात्र भरतीप्रक्रिया केव्हा सुरू होणार हा प्रश्न अधांतरी आहे. जिल्हा सहकारी बॅंकेच्या शाखांचे जिल्ह्यात व्यापक जाळे आहे. 288 शाखा व 11 विस्तार केंद्र अशा एकूण 299 शाखा आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर जाळे असलेली ही एकमेव बॅंक आहे. मात्र, बॅंकेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताणही आलेला आहे. त्यावर पर्याय म्हणून सुमारे अडीचशे कंत्राटी लिपिकांची भरती बॅंकेने केली आहे.
गेल्या फेब्रुवारीदरम्यान बॅंकेने नोकरभरतीचा प्रस्ताव सहकार विभागाकडे सादर केला होता. त्यास आता सहकार आयुक्तांनी परवानगी दिली आहे. नोकरभरतीसाठी शासनमान्य यादीवरील संस्थेमार्फतच प्रक्रिया राबवण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. मात्र, ही यादी अद्याप तयार नाही. त्यामुळे “टीसीएस’ व “आयबीपीएस’ या दोन कंपन्यांमार्फत भरतीप्रक्रिया राबवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, या दोन कंपन्या राज्य सरकारच्या विविध विभागांतील भरती प्रक्रियेत सध्या व्यस्त आहेत.
आयबीपीएस’ कंपनीमार्फत सध्या जिल्हा परिषदेची भरतीप्रक्रिया सुरू आहे. या भरतीमधील परीक्षा गेल्या एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून सुरूच आहेत. या दोन्ही कंपन्यांनी जिल्हा बॅंकेला सध्या आम्ही व्यस्त आहोत, असे कळवले असल्याचे समजले. त्यामुळे नोकरभरतीला परवानगी मिळाली, मात्र भरतीप्रक्रिया राबवण्यासाठी संस्था मिळेना अशी बॅंकेची सध्याची परिस्थिती असल्याचे समजले.
बॅंकेची यापूर्वीची नोकरभरती वादग्रस्त ठरली होती. हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. बॅंकेच्या संचालकांवरही आक्षेप घेतले गेले होते. त्यामुळे नव्याने होणाऱ्या भरतीप्रक्रियेकडे सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष राहणार आहे. यापूर्वीच्या नोकरभरतीमध्ये थेट संचालकांवर आरोप झाले होते. याबाबत सहकार खात्याने चौकशी केल्यानंतर पदे भरण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी अद्यापही काही पदे अद्यापही भरली गेली नाही. तो वाद अद्यापि वादग्रस्त आहे.
Tags :
11668
10





