महाराष्ट्र
14274
10
बैलगाडीतून वऱ्हाडी अन् टाळ मृदंगाचा गजर, अनोख्या लग्नाची चर्चा
By Admin
बैलगाडीतून वऱ्हाडी अन् टाळ मृदंगाचा गजर, अनोख्या लग्नाची चर्चा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव येथे आज एक अनोखा विवाहसोहळा पार पडला. येथील गाडेकर आणि भवार कुटुंबातील देवेंद्र भवार आणि पल्लवी गाडेकर यांच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने चक्क वीस बैलगाडीतून वऱ्हाडी मंडळी विवाहस्थळी दाखल झाले.
त्याशिवाय नवरदेव आणि नवरीने देखील पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. या विवाह सोहळ्याची सध्या परिसरासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
शिंगवे केशव येथील प्रल्हाद भवार यांचे चिरंजीव देवेंद्र भवार आणि याच गावातील हभप गंगाधर महाराज गाडेकर यांची कन्या पल्लवी गाडेकर यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्न सोहळ्यादरम्यान वाहनांमधून तसेच फटक्यांच्या आतिषबाजीतून होणारे प्रदूषण आणि डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण टाळत पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. लग्नाचे वऱ्हाडी बैलगाडीतून आले. यासाठी 20 बैलगाड्या सुंदर पद्धतीने सजवण्यात आल्या होत्या. एका मागून येणाऱ्या बैलगाड्या त्यात बसलेले वऱ्हाडी, सर्वात पुढे नवरदेव देवेंद्रही बैलगाडीतच अशी ही वऱ्हाडी मंडळी गावातील श्री क्षेत्र दत्त मंदिराकडे निघाली. विशेष म्हणजे वऱ्हाडीचे स्वागत करण्यासाठी टाळ मृदंगाचा गजर करण्यात आला. तर महिला आणि वारकरी मुलांनी फुगडी खेळत वाजत-
गाजत वऱ्हाडी मंडळी विवाहस्थळी दाखल झाले.
नवरदेव देवेंद्र भवार याने संत तुकाराम महाराजांप्रमाणे वेशभूषा परिधान केली होती तर नवरी मुलगी पल्लवी हिने राजमाता जिजाऊ यांच्या प्रमाणे वेशभूषा केली होती. देवेंद्रच्या हातात विना तर पल्लवीच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते.हा विवाह सोहळा जुन्या काळातील विवाह सोहळ्याची आठवण करून देणारा होता. आपण वारकरी संप्रदायातील असल्याने अशा अनोख्या पद्धतीने विवाह होत असल्याने आनंद होत असल्याचे नवरदेव देवेंद्र भवार याने एबीपी माझाशी बोलताना सांगितले. तर डीजेमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखत अतिशय अनोख्या पद्धतीने आपल्या मुलीचा विवाह सोहळा व्हावा अशी आपली इच्छा असल्याने आपण हे नियोजन केल्याचे नवरी मुलगी पल्लवीचे वडील हभप गंगाधर महाराज गाडेकर यांनी सांगितले.
केवळ समाजप्रबोधन न करता आपण स्वतः आचरणात या सर्व गोष्टी आणायला हव्यात असं त्यांनी सांगितले. तर या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील या विवाह सोहळ्याचे कौतुक केले. गाडेकर महाराज हे नेहमीच किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतातच मात्र त्यांनी स्वतः आपल्या मुलीचे असे पारंपरिक पद्धतीने लग्न लावून समाजापुढे एक आदर्श ठेवल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी म्हंटले आहे.सध्या या लग्नाची परिसरातच नाही तर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
Tags :

