शेवगावची चूक, सजा पाथर्डीला, नगरपरिषदेसह 19 गावांच्या पाणीयोजनेचा वीजपुरवठा खंडित
नगर सिटीझन live team-
पाथर्डी नगरपरिषद आणि 19 गावांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीजपुरवठा वीजकंपनीने मंगळवारी खंडित केला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाथर्डीकरांचे पाण्यासाठी हाल सुरू झाले आहेत. दरम्यान, पाथर्डी आणि शेवगावसाठी ही एकच योजना आहे. पाथर्डी पालिकेकडे कोणतीही थकबाकी नाही. मात्र, शेवगाव पालिकेकडे 2 कोटी 79 लाखांची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पैठणच्या जायकवाडी धरणात मुबलक पाणी आहे. या योजनेतून शेवगाव -पाथर्डी व ग्रामीण भागातील काही गावांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. योजना जिल्हा परिषद चालविते. पाथर्डी व शेवगाव पालिका योजनेच्या ग्राहक आहेत.
पाथर्डी पालिकेने पाणी योजनेचे बिल अदा केले आहे. थकबाकी नाही. मात्र, शेवगाव पालिकेकडे योजनेची 2 कोटी 79 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे वीजबिल भरा; अन्यथा वीजजोड मिळणार नाही, अशी भूमिका वीजवितरण कंपनीने घेतली आहे. प्रांताधिकारी देवदत्त केकाण व उपअभियंता अनिल सानप यांनी शेवगाव पालिकेकडे जाऊन थकबाकीची रक्कम भरा म्हणजे वीज कंपनीला पैसे भरता येतील असे सांगितले. बुधवारी दोन्ही पालिका, महसूल, वीजवितरण कंपनी यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या. रात्री उशिरापर्यंत यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे केकाण यांनी सांगितले.