पाथर्डी : खंडोबा मंदिरातून 34 हजारांच्या मुद्देमालाची चोरी
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदानातील खंडोबा मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. उमाजी भाऊ सुपेकर यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दत्त जयंतीच्या दिवशी रात्री दहा ते पहाटे पाचच्या दरम्यान मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील सुमारे 34 हजाराचा ऐवज लंपास करण्यात आलेला आहे. चोरट्याने दत्ताची पितळी धातूची मूर्ती मंदिरातून पळवली. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उमाजी सुपेकर मंदिरात पूजा करण्यासाठी आले असता मुख्य गेटचे कुलूप तोडलेले दिसले.
सुपेकरांनी मंदिरात जावून पाहिले असता दत्त मंदीर, महादेव मंदीर, पंचमुखी मंदीराचे कुलूप तोडलेले दिसले. त्याचवेळी मंदिरात चोरी झाल्याचा संशय आला. मंदिरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. मंदिरातील वस्तू चोरीस गेल्या आहेत. लोखंडी मंदिराचे साहित्य, तांब्याच्या व पितळाच्या मंदिरातील पूजेच्या वस्तू असा एकूण 34 हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. चोरट्यांनी आता चोरीचा मोर्चा धार्मिक स्थळांकडे वळवला आहे.