दरोडेंच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना अटक, एक फरार
शेवगाव तालुक्यातील दोघांना अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
लातूरमध्ये दरोडा टाकून 13 लाख रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या पाच दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरातील यशवंत नगर आणि अंबाजोगाई मार्गावरील सिद्धिविनायक नगर येथे धारधार हत्यारांचा धाक दाखवून दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता.
यशवंत नगरमधील राहुल चंद्रकांत दरोडे यांच्या घरावर सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दरोडे दाम्पत्याला मारहाण करून आणि लोखंडी रॉड, चाकू आणि काठीचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, तसेच कपाटातील रोख रक्कम असा एकूण 4 लाख 85 हजार 200 रुपयांचा माल लंपास केला. याप्रकरणी राहुल दरोडे यांच्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच दिवशी याच दरोडेखोरांनी सिद्धिविनायक नगर भागातील घरावर दरोडा टाकून 8 लाख 50 हजारांचा माल लंपास केला. या प्रकरणी वैजनाथ माधवराव येवलगे यांनी पोलिसात तक्रार दिली. या दोन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास करत दरोडेखोरांपैकी पाच जणांना अटक केली, तर एक जण फरार झाला आहे.
आदेश उर्फ लाल्या चव्हाण (रा. सालवडगाव, ता. पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), नितीन संजय काळे (रा. बालनटाकळी, ता. शेवगाव. जि. नगर), महेश आत्माराम चव्हाण (रा. गेवराई, जि. बीड), विकास उर्फ विक्या रामभाऊ भोसले (रा. उमापूर, ता. गेवराई, जि. बीड), रवींद्र संजय काळे (रा. बालनटाकळी, ता. शेवगाव, जि. नगर) अशी अटक करण्यात आलेल्या पाच दरोडेखोरांची नावे असून लक्ष्मण पांडुरंग भोसले (रा. उमापूर, ता. गेवराई, जि. बीड) हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.