महाराष्ट्र
जिल्हा विभाजन आवश्यकच : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे
By Admin
जिल्हा विभाजन आवश्यकच : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे जिल्हयाचे विभाजन करणे आवश्यक आहे, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रा. राम शिंदे यांनी मांडले.
मी पालकमंत्री असताना जिल्हा विभाजनाचा विषय अंतिम टप्प्यात होता. मात्र, इतर जिल्ह्याची मागणी पुढे आल्यामुळे जिल्हा विभाजनाचा प्रश्न रेंगाळला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
आमदार प्रा. राम शिंदे हे सोमवारी नगरला आले होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रश्न ऐरणीवर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा अहमदनगर जिल्हा विभाजनाला विरोध आहे. भाजपची भूमिका काय आहे, याकडे आमदार शिंदे यांचे लक्ष वेधले असता आ. शिंदे म्हणाले, शासनापुढे राज्यातील जिल्हा विभाजनाचा प्रश्न उपस्थित झाल्यास अहमदनगर जिल्ह्याला प्राधान्य मिळणार आहे. जिल्हा विभाजनाबाबत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाला. मात्र, पालघर जिल्ह्याची अवस्था चांगली नसल्याच्या खासदार विखे यांच्या वक्तव्यावर आ. शिंदे म्हणाले, नगर जिल्हा सधन आहे. जिल्हा विभाजन झाल्याने हा प्रश्न निर्माण होणार नाही. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रपुरुषांची नावे जिल्ह्याला दिली जात आहे. त्यामुळे जिल्ह्याला अहिल्यादेवीनगर हे नाव द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली. मात्र, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी तसेच विधिमंडळ व संसद लोकप्रतिनिधी यांचा विचार घेऊनच नामांतराचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'पक्षश्रेष्ठींचे आदेश आल्यास एकमत होईल'
जिल्हा विभाजनच्या मागणीला खासदार डॉ. सुजय विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा विरोध आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे जेव्हा विरोधीपक्ष नेते होते, तेव्हा त्यांचा विभाजनाला पाठिंबा होता. आता ते सत्तेत आहेत. त्यांनी त्यांची भूमिका बदलू नये. दुसरीकडे नामांतराची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पक्षातील वरिष्ठाकडून सूचना आल्यानंतर सर्वांचे एकमत होईल, असा आशावाद व्यक्त केला.
पदवीधरसाठी विखे, विसपुते व पाटील चर्चेत
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या वतीने जिल्ह्यातील राजेंद्र विखे पाटील, नाशिकच्या मीनाक्षी पाटील व धुळयाचे धनंजय विसपुते यांची नावे चर्चेत आहेत. या तीन नावांपैकी ऐनवेळी वेगळे नाव देखील जाहीर होऊ शकते.अंतिम उमेदवारीबाबत भाजप वरिष्ठस्तरावर चर्चा सुरु असल्याचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
75 वर्षे झाली; परंतु अद्याप जिल्ह्याचे प्रश्न सुटले नाहीत. नगर जिल्ह्याचे दोन छोटे जिल्हे झाल्यास प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मी पालकमंत्री असताना जिल्हा विभाजनाचा विषय अंतिम टप्प्यात आला होता. त्यासाठी 800 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. नवीन जिल्ह्याच्या मुख्यालयाबाबत शासन जो निर्णय घेईल तो मान्य असणार आहे.
– राम शिंदे, आमदार, भाजप.
Tags :
115173
10