नवरात्रोत्सवानिमित्त आ. मोनिका राजळे यांचेकडून सहकुटुंब मोहटादेवीची महापूजा
भाविकांची संख्या वाढवून पंधराहजार करावी, प्रशासनाकडे मागणी
पाथर्डी प्रतिनिधी:
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार देवीच्या दर्शनासाठी ऑनलाइन पासद्वारे असलेली पाचहजार भाविकांची संख्या वाढवून पंधराहजार करावी, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आमदार मोनिका राजळे यांनी मोहटादेवीच्या पूजेसाठी सहकुटूंब हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी आ.राजळे यांचा सत्कार केला.
आमदार राजळे म्हणाल्या, जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाइन पास द्वारे पाच हजार भाविकांना दर्शन ही संख्या अतिशय कमी आहे. देवीला राज्यभरातून मोठ्या संख्येने भावीक येतात त्यात महिलांची संख्या मोठी असते. पासची उपलब्ध संख्या संपल्यामुळे अनेकांना दर्शन न घेताच परतावे लागते. शिर्डी प्रमाणेच प्रशासनाने मोहटादेवी दर्शनासाठी १५००० संख्या करावी तसेच मोहटाफाटा ते गड भाविकांना आणण्या- नेण्यासाठी देवस्थान समितीच्या वतीने वाहनाची व्यवस्था करण्यात यावी.
जिल्हा प्रशासनाने कोविड मुळे कडक निर्बंध लागू केले असले, तरी मोहटादेवीचा भाविक वर्ग राज्यभरात पसरला आहे. देवीचे महात्म्य देशभरात असून प्रशासनाच्या कडक निर्बंधांमुळे भाविकात भीतीचे वातावरण पसरले आहे. याचा परिणाम दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच भाविकांच्या भावनेचाही विचार करावा. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून मोहटादेवी मंदिर बंद असल्यामुळे भाविकांवर आपली उपजीविका करणारे येथील हार, पेढे, व्यवसायिक, हॉटेल चालकांना उपासमार करावी लागत असल्यामुळे प्रशासनाने त्यांना सहानुभूतिपूर्वक वागणूक देणे गरजेचे आहे.देवीच्या कृपेने कोरोनाचा पूर्ण नायनाट होऊन पुढील वर्षी नवरात्र उत्सव उत्साहात साजरा व्हावा, अशी प्रार्थना देवीचरणी करते, असे राजळे म्हणाल्या.