पाथर्डी- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त चेकेवाडीत मोफत सात बारा वाटप
पाथर्डी- प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त डिजिटल स्वाक्षरी असणारा सुधारित सातबाराची पहिली प्रत मोफत देण्याचा कार्यक्रम, महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महसूल भवन तथा मंडळ अधिकारी कार्यालय माणिकदौंडी यांचे तर्फे चेकेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी डिजिटल स्वाक्षरी असणारा सुधारित सातबाराचे वाटप चेकेवाडी येथील सर्व शेतकऱ्यांना पहिली प्रत मोफत देण्यात आली. यावेळी माणिकदौंडी च्या मंडळाधिकारी श्रीमती वैशाली दळवी, तलाठी राजू मेरड, पोलीस पाटील वसंत वाघमारे, सरपंच मिठू चितळे, उपसरपंच पांडुरंग जीवडे, माजी सरपंच अशोक गाढे, पोपट चेके, विष्णू जिवडे यांचे सह गावातील ग्रामस्थ व तरूण वर्ग उपस्थित होते.
या विषयी अधिक माहिती देतांना तलाठी राजु मेरड यांनी शासन आपल्या दारी या संकल्पनेतून प्रशासन व सर्व सामान्य शेतकरी यांच्यातील अंतर कमी झाले पाहिजे. तसेच आप-आपल्या तांड्या- वस्त्या वरील सर्व सामान्य शेतकरी व प्रशासन यांच्यातील सूसंवाद कायम राहील, सर्व शेतकऱ्यांनी मोफत सात बारा घेऊन जा आणि त्या वर आपले पूर्ण नाव, आपले पूर्ण क्षेत्र याची खात्री करावी.
उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी द्वारे आप-आपल्या पिकांच्या नोंदी भराव्यात, असे आव्हान केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रास्ताविक पोलिस पाटील वसंत वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी सरपंच अशोक गाढे यांनी केले.