मुलीच्या विवाह प्रसंगी तिच्याच नावावर केली मुदत ठेव पावती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील यशोमंदिर सहकारी पतपेढीचे सभासद तथा उद्योजक डावरे यांनी आपल्या कन्येच्या विवाह प्रसंगी सत्काराला फाटा देत मुलीच्या नावावर मुदत ठेव पावती करत विविध देवस्थानांही आर्थिक मदत करत नवा पायंडा पाडला आहे. याबद्दल डावरे कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबई येथील नामवंत उद्योजक तथा निंब्रळ गावचे भूमिपुत्र डावरे यांनी मुलीच्या लग्नातील सत्काराचा खर्च टाळून काही रक्कम मुदत ठेव पावती करून तिच्या नावावर ठेवली आहे. भविष्यकाळात मुलीला जेव्हा गरज असेल, तेव्हा तिला यातून मदत होईल. यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचे डावरे यांनी सांगितले. याचबरोबर या भागातील अंबिका देवस्थान ट्रस्ट व म्हाळदेवी येथील खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांनाही आर्थिक मदत करून नवा पायंडा पाडला आहे. याप्रसंगी विधीज्ञ के. बी. हांडे, विश्वास आरोटे, यशोमंदिर सहकारी पतपेढीचे अकोले शाखाधिकारी दिनकर गायकर, रोखपाल जालिंदर चव्हाण आदी उपस्थित होते.