महाराष्ट्र
334
10
श्री साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव सुरु
By Admin
श्री साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव सुरु
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिर्डी : येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत श्री साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत आहे. १०३ वा श्रींचा पुण्यतिथी उत्सव आज उत्साहात सुरू झाला.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर याही वर्षीचा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येत आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिकात्मक भिक्षा झोळीकरीता गांवकरी/साईभक्तांकडून भिक्षा स्विकारण्याकामी मंदिर परीसरात व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘यावर्षीही कोरोना व्हायरसच्या संकटामुळे शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानुसार ५ एप्रिलपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. राज्य शासनाने ७ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळे काही अटी शर्तीवर खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शन तत्वांवर श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. परंतु अजून कोरोना व्हायरसचे सावट संपलेले नसल्यामुळे श्रींचा पुण्यतिथी उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. तसेच श्रींचा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार भिक्षाझोळीचा कार्यक्रम होत असतो. त्याअनुषंगाने उत्सवाच्या मुख्य दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या भिक्षाझोळीकरीता गावकरी व साईभक्तांकडून भिक्षा स्वीकारण्यासाठी मंदिर परिसरातील गेट नंबर चार, पिंपळवाडी रोड गेट नंबर दोन, चावडी समोर, नाट्यगृहा शेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी गांवकरी व साईभक्तांनी भिक्षाझोळीत दान भिक्षा देतांना मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतरासंदर्भातील नियमांचे पालन करुन भिक्षाझोळी काऊंटरवर दान भिक्षा जमा करावी. संस्थानचे संरक्षण व दान भिक्षा स्वीकारणारे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.’
Tags :

