शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश पालवे यांचा बैठा सत्याग्रह
पाथर्डी प्रतिनिधी:
माणिकदौंडी व परिसरातील जाटदेवळे, पिरेवाडी, बोरसेवाडी, चितळवाडी, लांडकवाडी, आल्हनवाडी,पत्र्याचातांडा, धनगरवाडी, चेकेवाडी, घुमटवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे संपूर्ण पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, या मागणीसाठी मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष तथा शिरसाटवाडीचे सरपंच अविनाश पालवे यांनी माणिकदौंडी येथे तीन तास बैठा सत्याग्रह आंदोलन केले.
अधिकाऱ्यांनी फोनवरुन आश्वासन देऊन आंदोलन संपवण्याची विनंती केली असता, जोपर्यंत अधिकारी येथे येणार नाहीत, तोपर्यंत उठणार नाही असा आक्रमक पवित्रा पालवे यांनी घेतला.
यानंतर ना.तहसीलदार भानुदास गुंजाळ, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, मंडळाधिकारी तलाठी हे आंदोलनस्थळी आले. यावेळी बोलतांना अविनाश पालवे म्हणाले की, या भागातील जनता ही कष्टकरी आहे. मागील वर्षी देखील फक्त पंचनामे झाले. मदत मात्र अजुन मिळाली नाही. याही वर्षी अतिवृष्टी झाली, त्यालाही महीना उलटला तरी अजुन संपूर्ण पंचनामेच नाहीत. प्रशासन एवढे ढिम्म कसे आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर तहसीलदार भानुदास गुंजाळ यांनी मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांची त्रिसदस्यीय समिती करून माणिकदौंडी परिसरातील वरील सर्व गावातील संपूर्ण पंचनामे आठवडाभरात पुर्ण करून त्यानंतर शासनाकडून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू असे आश्वासन दिले.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, संदीप काकडे, उपजिल्हाध्यक्ष आर के चव्हाण, उपतालुकाध्यक्ष अशोक आंधळे, विभागाध्यक्ष सुनील पवार, मल्हारी डमाळे, भैरवनाथ डमाळे, विनोद गव्हाणे, माणिकदौंडी सरपंच समीर पठाण, चितळवाडी सरपंच संजय चितळे, घुमटवाडी सरपंच अशोकराव चव्हाण, शिवसेना तालुकाध्यक्ष अंकुश चितळे, महादेव डमाळे, महादेव आघाव, अर्जुन पाखरे, दशरथ पोमन, शिवा पाखरे, आजिनाथ डमाळे, विजय आघाव यांसह शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.