पाथर्डी- तिसगावसह इतर तालुक्यातील ६१ गावांमध्ये कडक लाॅकडाऊन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः ग्रामीण भागात करोनाचा आलेख सातत्याने उंचावत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात विविध तालुक्यातील तब्बल ६१ गावांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापणा दि. 4 ऑक्टोबर ते दि. 13 ऑक्टोबर पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन 500 ते 800 च्या दरम्यान कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्के पेक्षा जास्त आहे. यामुळे ज्या गावांमध्ये 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधित आहेत अशा गावांमध्ये जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील तब्बल 11 तालुक्यातील 61 गावांचा समावेश आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील तब्बल 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.