श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ चे तीन शिक्षक सन्मानित
By Admin
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ चे तीन शिक्षक सन्मानित
पाथर्डी - प्रतिनिधी:
निवारा बालगृह जामखेड येथे ग्रामीण विकास केंद्राच्यावतीने पाथर्डी येथील शाहीर भारत गाडेकर यांना नुकताच पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांच्या हस्ते शाहिरी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रबोधनकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जामखेड येथील निवारा बालगृह येथे पार पडलेल्या निवारा महोत्सव २०२१ या कार्यक्रमाअंतर्गत शाहिरी जलसा चे आयोजन करण्यात आले होते. शाहिरी जलसा मध्ये महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध शाहिरांनी आपली कला सादर केली. शाहीर वसंत डंबाळे, दिलीप शिंदे, हसन शेख पाटेवाडीकर यांनाही यावेळी प्रबोधनकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच शाहिरी जलसा मध्ये साथ-संगत करणारे पाथर्डी येथील राजेंद्र चव्हाण (ढोलकी) व सचिन साळवे (हार्मोनियम) यांना भास्करराव पेरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. शाहीर भारत गाडेकर, राजेंद्र चव्हाण व सचिन साळवे हे पाथर्डी येथील श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ या नामांकित संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
ग्रामीण विकास केंद्र या संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्राम विकास केंद्र ही संस्था १९९५मध्ये स्थापन झाली. सदर संस्था मानवी हक्क, अधिकार, न्याय, पारधी विकास आराखडा, महिला सक्षमीकरण, बाल संगोपन व शिक्षण, दलित, आदिवासी, पारधी, भिल्ल, भटके-विमुक्त, वंचित, निराधार, शोषित, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, लोककलावंत अन्याय व अत्याचार ग्रस्त घटकासाठी कार्य करत आहे.
निवारा महोत्सव कार्यक्रमांतर्गत लोककलावंत पुरस्कार वितरण, मनोरंजनातून प्रबोधन, विद्यार्थ्यांचे संस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आदर्श सरपंच भास्करराव पेरे, जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, करमाळा येथील सोन्याचे व्यापारी अजित सोनी, लावण्यसम्राज्ञी सिनेतारका संजीवनी मुळे नगरकर, प्रदेशाध्यक्ष म.रा. पत्रकार संघ मुंबई वसंतराव मुंडे, शब्दगंधचे सुनिल गोसावी, राजेंद्र उदागे,भगवान राऊत, बाळासाहेब मुळे, ऊस तोडणी कामगार प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर, प्रा.अशोक कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.