कोरोनाच्या निराकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कडक निर्बंध लादून प्रशासन ते आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. यावर लसीक एकमेव पर्याय सध्या दिसत आहे.
परंतु तो पर्यंत कडक निर्बंध लादून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशासन कम्बर कसत आहे. जिल्ह्यात सध्या संचारबंदी असूनही अनेक लोक बिनधास्त घराबाहेर पडत आहेत.
बेजाबदारपणे फिरत आहेत. यावर आता पोलिसांनी कारवाईचा कडक बडगा उगारला आहे. विविध प्रकारच्या दुचाकीसह बुलेट, तसेच मोठ्या खाजगी वाहनांना पोलिसांनी जप्त केले आहे.
हे करताना यामध्ये स्थानिक राजकीय पुढारी, नगरसेवक, आमदार तसेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांची ओळख सांगत मध्यस्थाकडून गाड्या सोडवण्यासाठी विनंती वजा दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांनी मात्र आपला खाक्या दाखवताच मध्यस्थीही गप्प झाले आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदीचा आदेश देण्यात आले आहेत. असे असताना अनेक नागरिक या ना त्या निमित्ताने विनाकारण रस्त्यावर येतात. भाजी खरेदी, किराणामाल यांच्यासह मेडिकलमधून औषधे घेण्याचे कारण देत लोक बाहेर पडत आहेत.
बहुतांश नागरिक खोटी व चुकीची माहिती देऊन विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या जुन्या चिठ्ठ्या घेऊन बरेच नागरिक रस्त्यावर येत आहेत. परंतु आता पोलिसांनी आपला कारवाईचा बडगा जरा सक्त केला आणि आता ही संख्या रोडावली आहे.
दरम्यान, जिल्ह्यामधील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सर्वानी नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक निर्बंध लादले गेले आहेत. याचा परिणाम स्वरूप रुग्ण आकडेवारी कमी होताना दिसत आहे.