पास नसल्याच्या कारणावरून एसटी कंडक्टरकडून पाचवीच्या विद्यार्थ्याला हायवेवर उतरवण्याचा धक्कादायक प्रकार!
नगर सिटीझन न्यूज नेटवर्क-
पुरोगामी महाराष्ट्रात माणुसकीला हादरवणारी घटना समोर आली आहे.सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एका एसटी बसमधून इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या चिमुकल्याला थेट हायवेवर उतरवण्यात आले. ही घटना समोर येताच सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रथमेश हा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे एसटी बसने घरी जात होता. मात्र त्या दिवशी त्याचा बस पास चुकून घरी राहिला होता.
तिकीट काढण्यासाठी त्याच्याकडे पैसेही नव्हते.
त्याने कंडक्टरला विनंती करत “माझ्या वडिलांना फोन करा, ते पैसे देतील” असे सांगितले. मात्र निर्दयी कंडक्टरने कोणतीही सहानुभूती न दाखवता त्याला मंगळवेढा–सोलापूर महामार्गावर बसमधून उतरवले.
हा मुलगा अल्पवयीन असून महामार्गासारख्या धोकादायक ठिकाणी त्याला एकटं सोडणं म्हणजे थेट त्या मुलाचा जीव धोक्यात घालणं.
रस्त्यावर उतरवल्यानंतर तो घाबरून गेला, रडत होता. सुदैवाने एका दुचाकीस्वाराने त्याला पाहून मदत केली आणि तो सुरक्षितपणे घरी पोहोचला.
मात्र या घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे — बसमधील एकाही प्रवाशाने हस्तक्षेप केला नाही.
एकाही व्यक्तीने कंडक्टरला थांबवलं नाही,
एकाही प्रवाशाने त्या मुलासाठी पैसे दिले नाहीत,
एकाही माणसाने “तो मुलगा आहे” असं ठामपणे सांगितलं नाही.
लक्षात ठेवा— वाईट माणसं समाज नष्ट करत नाहीत…गप्प बसणारी माणसं समाज मारतात.
आज तो मुलगा हायवेवर उतरला…
उद्या तुमचं मूल उतरवलं गेलं,
तेव्हा फक्त बातमी वाचून संताप व्यक्त करायचा का?
वाईट माणसं कमी असतात… पण गप्प बसणारे खूप असतात, आणि तेच समाजाला धोकादायक ठरतात.
माणूस व्हा…
फक्त प्रवासी नाही
कंडक्टर साहेब कायदा असावा, नियम असावेत — पण माणुसकी त्याहून मोठी असते!