'हा' ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका कमी; संशोधनात खुलासा
By Admin
'हा' ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका कमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 26 एप्रिल 2021
कोरोनामुळे भारतासह जगभरात हाहाकार माजला असताना संशोधकांनी 'ओ' रक्तगट असणाऱ्यांना या व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका कमी असल्याचा दावा केला आहे. 'धूम्रपान करणाऱ्या व शाकाहारी भोजन करणाऱ्यांत 'सीरो पॉझिटिव्हिटी' कमी आढळली असून, 'ओ' ब्लड ग्रुप असणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी आहे', असे त्यांनी म्हटले आहे. तर A ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा अधिक धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे.
वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) नुकतेच भारतात 'सीरो सर्वेक्षण' केले.
त्यात धूम्रपान करणाऱ्यांत 'सीरो पॉझिटिव्हिटी' दर अत्यंत कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे. 'कोविड-१९ श्वसनासंबंधीचा आजार आहे. पण, त्यानंतरही धूम्रपान त्याच्या संसर्गापासून पहिल्या रांगेतील बचाव करू शकतो. कारण, धूम्रपानामुळे अधिक श्लेष्मा तयार होतो', असे संशोधकांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या संसर्गावरील धूम्रपान व निकोटिनचा प्रभाव समजण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 'धूम्रपानाला आरोग्यासाठी अपायकारक मानले जाते. त्याचा संबंध अनेक आजारांशीही असतो. धूम्रपान व निकोटिनचा कोरोनाच्या संसर्गावरील प्रभाव अद्याप स्पष्ट झाला नाही.
त्यामुळे या संशोधनाचे निष्कर्ष धूम्रपानाला प्रोत्साहन देणारे आहेत असे मानण्याची चूक कुणीही करू नये', असे ते म्हणाले. 'शाकाहारी भोजन फायबरने ओतप्रोत भरलेले असते. त्यामुळे ते कोरोनाविरोधात रोगप्रतिकारकक्षमता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते', असेही संशोधकांनी या प्रकरणी म्हटले आहे. 'ओ' रक्तगट असणाऱ्या लोकांना संसर्गाचा धोका कमी आहे.
तसेच 'बी' व 'एबी' रक्तगट असणाऱ्यांच्या बाबतीत ही जोखीम सर्वाधिक आहे', असेही शास्त्रज्ञांनी आपल्या निष्कर्षांत म्हटले आहे. दरम्यान, हे सर्वेक्षण १४० वैज्ञानिक व डॉक्टरांनी केले. त्यात शहरी व निमशहरी केंद्रांतील 'सीएसआयआर'च्या 40 हून अधिक प्रयोगशाळांत काम करणाऱ्या 10,427 प्रौढ व त्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांचे आकलन करण्यात आले.