महाराष्ट्र
48151
10
शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर टीईटी परीक्षा व विविध मागण्या
By Admin
शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर टीईटी परीक्षा व विविध मागण्या संदर्भात मोर्चा, नाशिक शहरात कोंडी
नाशिक न्यूज नेटवर्क -
राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व माध्यमातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात येऊ नये, यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, शिक्षण, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने शासनाकडून सतत दुर्लक्ष होत आहे. सर्व शिक्षकांना टीईटी सक्ती करणे अन्यायकारक आहे. या निर्णया विरोधात राज्यात आंदोलनाची हाक देण्यात आली. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व माध्यमातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात येऊ नये, १५ मार्च राेजीचा संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यात येऊन जुन्या निकषाप्रमाणे संच मान्यता करण्यात यावी, शालेयस्तरावरील सर्व प्रकारची ऑनलाईन आणि अशैक्षणिक कामे बंद करण्यात यावी अथवा त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी, शिक्षण सेवक योजना रद्द करून शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रलंबित मागण्यां संघटना प्रतिनिधीशी चर्चा करून सोडविण्यात याव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या.
मोर्चा ईदगाह मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ परिसरात मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली. वाहतूक विभागाच्या वतीने रिक्षा, दुचाकी तसेच चारचाकी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. सिटी लिंक बस तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बस रस्त्यावरच असल्याने वाहतूक खोळंबली. मोर्चा निघाला असतानाच शाळा सुटली, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर शासकीय कन्या विद्यालयाच्या आवारात ठिय्या दिला. शासकीय निर्णयाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Tags :
48151
10




