केंद्र सरकारने खत दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा.-गणेश सुपेकर
पाथर्डी- प्रतिनिधी
सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांवर केंद्र सरकारकडून अन्याय होतांना दिसत आहे. सध्या देशात चालू असलेल्या कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठे विकायचा, याची चिंता सतावत असतांना शेतमालाला बाजार पेठ नसतांना शेती पिकवावी का नाही, अशी परिस्थिती असतांना केंद्र सरकारकडून रासायनिक खतांमध्ये ६०० ते ७०० रुपये दरवाढ करण्यात आली असून हा केंद्र शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार आणि जिल्हाधिकार्यांना पाठवीत आहोत, अशी प्रतिक्रिया भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश सुपेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
अगोदरच संकटात असलेला शेतकरी खतांच्या दरवाढीच्या निर्णयामुळे अधिक संकटात येणार आहे. शेतकऱ्यांनी शेती सोडून हिमालयात जावे की काय? असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत. ज्या तुलनेत खतांचे दर वाढले त्या तुलनेत शेतकरी मालाचे दर अजिबात वाढलेले नाही. त्यामुळे शेती करणे जिकिरीचे बनले आहे, असे गणेश सुपेकर म्हणाले.
केंद्र सरकारने हा खतांच्या दरवाढीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, याबाबत आपण तहसीलदार श्याम वाडकर आणि जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना तसे निवेदन पाठविणार आहोत, असे गणेश सुपेकर यांनी स्पष्ट केले.