रुग्णांना दिलासा- 'या' तालुक्यात म्युकोरमायकॉसिस आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 18 मे 2021,मंगळवार
कोरोना पाठोपाठ आता म्युकोरमायकॉसिस या आजाराने श्रीरामपूरकरांच्या दरवाज्यावर दस्तक दिली आहे. या आजाराचे आतापर्यंत सुमारे नऊ रुग्ण समोर आले आहेत. मात्र यातील एका रुग्णावर श्रीरामपुरात यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने श्रीरामपूरकरांनी या आजाराला घाबरून न जाता धीराने तोंड द्यावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी केले आहे.
कोरोना पाठोपाठ आता श्रीरामपुरात म्युकोरमायकॉसिस या आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नऊ रुग्णांचे निदान झाले आहे. यातील काहींवर नगर, तर काही औरंगाबाद व नाशिक येथे उपचार घेत आहेत. यापैकी ज्या रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशा एका रुग्णाची येथील साखर कामगार रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. प्रणवकुमार ठाकूर, डॉ. गणेश जोशी, डॉ. शरद सातपुते, डॉ. ऋतुजा जगधने यांनी ही शस्त्रक्रिया केली असून ती यशस्वी झाली आहे. सद्यस्थितीत या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती साखर कामगार रुग्णालयाचे डॉ. रवींद्र जगधने यांनी दिली. तसेच दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविल्याचेही त्यांनी सांगितले. म्युकोरमायकॉसिस हा आजार झालेल्या रुग्णांना त्यांच्या आजारातील तीव्रतेनुसार अमफोनेक्स ही इंजेक्शन दिले जातात. मात्र, या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आहे, व ज्यांना म्युकोरमायकॉसिस हा आजार झालेला आहे, अशाच रुग्णांवर साखर कामगार रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. म्युकोरमायकॉसिस या आजारावर श्रीरामपुरात उपचार होत असल्याने रुग्णांनी घाबरून न जाता या आजाराला धीराने सामोरे जावे, असे आवाहन डॉ. जगधने यांनी केले.