रासायनिक खतांच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ; शेतक-यांनी पिके कशी घ्यायची?
By Admin
रासायनिक खतांच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ; शेतक-यांनी पिके कशी घ्यायची?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 15 मे 2021 , शनिवार
रासायनिक खतांच्या अनुदानात कपात करण्यात आल्यामुळे रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत.कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह आठवडे बाजारांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे आधीच मोडले आहे. शेतकरी आता खरीप हंगामाकडे डोळे लावून बसली आहे. खरीप पेरणीसाठी लागणारे बी - बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी शेतकर्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. परंतु रासायनिक खतांच्या अनुदानात कपात करण्यात आल्याने रासायनिक खतांच्या किमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे ऐन अगोदरच संकटात असलेल्या शेतकर्यांच्या आर्थीक समस्यांत भर पडली आहे.
जिल्ह्यात सुमारे साडेसात लाखांच्यावर पेरणी लायक क्षेत्र आहे. बहुतांश परीसरात १५ मे नंतर बागायती संकरीत कपाशी वाणांची लागवडीस शेतकर्यांकडून प्राधान्य दिले जाते. सद्यस्थितीत खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांवर भर दिला जात असून संकरीत वाणांसाठी सिंचनासाठीची देखिल पूर्वतयारी केली जात आहे.
दरम्यान, कोरोना संकटामुळे शासनाने रासायनिक खतांवरील अनुदानात कपात केली. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत रासायनिक खतांचे दर दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले. एकीकडे शेतकर्यांच्या शेतमालाला यथातथाच दर मिळत आहे. त्यात रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकर्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
रासायनिक खतांची तुलना पहाता १०.२६.२६ गतवर्षीचे दर ११७५ (यावर्षी १७७५), डिएची ११६५ (१९००), २०.२०.० - ९७५(१३५०),२४.२४.० -१३५० (१९००), पोटॅश ८५० (१०००) सुपर फॉस्फेेट ३७० (४७०), १२.३२.१६ - ११९० (१८००) असे दहा ते १५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
गतवर्षाच्या तुलनेत यंदा रासायनिक खतांच्या किमतीत ३०० ते ५०० रूपयांनी दरवाढ झाली आहे. लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधामुळे शेती अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे मजूर मिळणे जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे वाढते मजूरीचे दर, बी-बीयाण्यांसह, रासायनिक खते, कपाशी वा अन्य पिकांवर वेळोवेळी रासायनिक किटकनाशकांची फवारणी खर्चामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकर्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच शासनाकडून खतांना देण्यात येणार्या सबसिडीत कपात करण्यात आली असून ऐन खरीपपूर्व पेरणी काळात रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या अर्थचक्राला खिळ बसणार आहे.
रावसाहेब पाटील. शेतकरी
रासायनिक खतांमध्ये कोणतीही दरवाढ होणार नसल्याचे केंद्र शासनाने एप्रिल महिन्यात जाहीर केले होते. परंतु यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत गतवर्षीच्या दरांपेक्षा सरासरी सर्वच खतांमध्ये किमान १० ते १५ टक्क्यांनी दरवाढ झाली असून आधीच गेल्या वर्षभरापासून कोरोना संकट काळात शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक झाली आहे. त्यात प्रमाणाबाहेर पाऊस, वारंवार बेमोसमी पाऊस, वादळे, यामुळे हातातोडांशी आलेले शेती उत्पन्न वाया गेले आहे. शिवाय शेतीउत्पन्नाला कवडीमोल दर बाजारपेठात आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकरीवर्गावर या रासायनिक खतांच्या बेसुमार दरवाढीमुळे आणखीच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. केंद्र शासनाने अनुदान वाढवून देऊन रासायनिक खतांच्या वाढीव किमती कमी करून शेतकर्यांना दिलासा द्यावा.
विनोद तराळ - राज्याध्यक्ष, स्टेट सीड्स,पेस्टीसाईड्स फर्टीलायझर्स असोशियन महाराष्ट्र

