महाराष्ट्र
1958
10
चक्क कर्ज देणार्या बँकेनेच केली कर्जदाराची आर्थिक फसवणूक!
By Admin
चक्क कर्ज देणार्या बँकेनेच केली कर्जदाराची आर्थिक फसवणूक!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मुंबईतील उद्योजकाला संगमनेरातील जागा बिनशेती भासवून केली विक्री..
देशभरातून विविध घोटाळे, आर्थिक फसवणूकीच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत असताना आता संगमनेरातून मात्र फसवणूकीचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. मुंबईतील आपल्या उद्योगासाठी बँकेकडून अर्थपुरवठा घेणार्या कर्जदाराला ‘त्या’ बँकेनेच संगमनेरात जप्त केलेला प्रकल्प दाखवून तो घेण्यास भाग पाडले. त्यासाठी संगमनेरातील दुय्यम नोंदणी कार्यालयात सदरचा प्रकल्प बिनशेती केलेल्या जमीनीवर असल्याचे भासवून व तशी कागदपत्रे करुन संबंधित कर्जदाराची तब्बल 64 लाख रुपयांची फसवणूक केल्याने मुंबईतील नितीन अंबादास पिसे या उद्योजकाने महानगर बँकेच्या मुंबई शाखेचा व्यवस्थापक पंढरीनाथ तराळ व संगमनेरात खरेदी खत करुन देणारा बँकेचा दलाल ज्ञानदेव सुराजी मते या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेनेच आपल्या कर्जदाराची फसवणूक करण्याचा हा प्रकार बहुधा राज्यात पहिलाच ठरण्याची शक्यता असल्याने बँकींग विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नवी मुंबईत राहणार्या नितीन अंबादास पिसे या कागदी पिशव्या तयार करणार्या उद्योजकाने 2015 साली त्यांच्या व्यवसायातील उत्पादन वृद्धीसाठी नवीन युनिट घेण्यासाठी दि महानगर को ऑप बँकेच्या तुर्भे (मुंबई) शाखेकडे कर्जमागणी केली होती. त्यांच्या अर्जनुसार सदर बँकेने जानेवारी 2016 मध्ये त्यांचे बारा लाख रुपये मागणीचे कर्ज प्रकरण मंजूर केले व त्यानुसार कर्जदाराच्या दोन वेगवेगळ्या खात्यात प्रत्येकी सहा लाख याप्रमाणे 12 लाख रुपयांची रक्कमही बँकेकडून वर्ग करण्यात आली. मात्र तरीही कर्जदाराला आपल्याच खात्यात जमा झालेली कर्जाची रक्कम तांत्रिक कारणांनी काढता येत नव्हती.
याबाबत तुर्भे येथील बँकेत विचारणा केली असता तेथील व्यवस्थापकाने तुमचे खाते चालू खात्याच्या श्रेणीतील असल्याने तुम्हांला पैसे काढता येत नाही, त्यासाठी तुम्हाला कॅश क्रेडीट खाते उघडावे लागेल असे सांगितले. या सर्व घडामोडीत पंधरा दिवसांचा कालावधी गेला असतानाच महानगर बँकेच्या तुर्भे शाखेचा व्यवस्थापक पंढरीनाथ तराळ याने संबंधित कर्जदाराला फोन करुन ‘तुमच्यासाठी एक चांगली ऑफर’ असल्याचे सांगत त्यांना तातडीने बँकेत बोलावले. सदर कर्जदार बँकेत गेला असता व्यवस्थापकाने संगमनेर (जि.अहमदनगर) येथील कागदी बॉक्स बनविण्याचा एक कारखाना आम्ही थकबाकी पोटी जप्त केलेला असल्याचे त्यांना सांगत आपल्या लॅपटॉपवर तो कारखाना व तेथे सुरु असलेले कागदी खोक्यांचे उत्पादनही त्यांना दाखवले. मात्र आपण आत्ताच तुम्चया बँकेकडून 12 लाखांचे कर्ज घेतल्याचे सांगत नितीन पिसे यांनी सदर कारखाना घेण्यास असमर्थतता दर्शविली.
Tags :

