महाराष्ट्र
12562
10
तीसगाव- ऐतिहासिक बारवांचे अस्तित्व धोक्यात; अतिक्रमणाचा विळखा
By Admin
तीसगाव- ऐतिहासिक बारवांचे अस्तित्व धोक्यात; अतिक्रमणाचा विळखा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
इतिहासाची साक्ष देणारे गाव म्हणून पाथर्डी तालुक्यातील तिसगाव ओळखले जाते. मात्र, येथील ऐतिहासिक बारवेचे अस्तित्व अतिक्रमणामुळे नष्ट होत चालले आहे.
त्यामुळे इतिहासाची साक्ष पुसण्याचे काम सध्या होत असून, त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. तिसगावला ऐतिहासिक वारसा आहे. पाच वेशी, वाडे, पाचव्या ते आठव्या शतकातील चालुक्य कालीन मंदिर, निजामशाही कालीन बारव हा वारसा जपायला हवा. मात्र, येथील पाच पुरातन बारव आता शेवटच्या घटका मोजताना दिसत आहे. यापैकी दोन बारवांवर अतिक्रमण झाले आहे.
पूर्वीच्या काळात लाभलेल्या गावागावातील बारव, बाहुली विहीर, पाय विहीर या नावाने अस्तित्वात असलेली बारव यांच संवर्धन व्हावं, त्यांचं अस्तित्व पुढच्या पिढीसाठी कायम टिकवून रहावं, यासाठी शासनानेही 'महाराष्ट्र बारव मोहीम' हाती घेतली आहे. शासन बारव पुनरुज्जीवनासाठी योग्य पावले उचलत असताना, बारवांचे अस्तित्वच अतिक्रमण करत नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे.
एकेकाळी दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांची तहान भागविणार्या ऐतिहासिक बारवांची तिसगावात दुरवस्था होत आहे. तक्रार केली तर स्थानिक प्रशासन नुसते कागदी घोडे नाचविते. बारवेला कचराकुंडी समजून त्यात कचरा टाकला जात आहे. हे सर्वांत मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांचेच याकडे लक्ष नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक ऐतिहासिक वास्तू नष्ट झाल्या, तर काही होण्याच्या मार्गावर आहेत. अशा बारवांचे संवर्धन करण्यास स्थानिक प्रशासन सक्षम नसेल, तर पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित होणे गरजेचे आहे.
सध्या या बारवांचा उपयोग होत नसलातरी, भावी पिढीला पुरातन वास्तू प्रत्यक्षात दिसाव्यात, यासाठी ऐतिहासिक वारसा जतन करणे आपली व स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. राज्य शासनाने या मोहिमेची दखल घेतली असताना, स्थानिक प्रशासनाच्या जागेत असलेल्या बारवांवर अतिक्रमण होत असतान संबंधित अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी हा पुरातन वारसा जपण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
तीस वेशींमुळे तिसगाव नाव!
पाथर्डीपासून 12 किलोमीटरवर तिसगाव आहे. सलाबत खानाने हे गाव वसविलेले असून, या ठिकाणी तीस वेशी होत्या. म्हणून याला तिसगाव नाव पडलेले आहे. या वेशींपैकी काही वेशी इतिहासाची साक्ष देत आजही उभ्या आहेत. दगड व चुना यामध्ये या वेशींचे आकर्षक पद्धतीने बांधकाम केलेले असल्याने, त्या पर्यटकांना आकर्षित करतात. तीस वेशींपैकी अनेक वेशी आज पडलेल्या अवस्थेत आहेत. खरंतर त्यांचा जीर्णोद्धार करून ऐतिहासिक वारसा जपणे ही काळाची गरज आहे, असे इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. अशोक कानडे म्हणाले.
ग्रामपंचायतीच्या जागेतील पुरातन बारवांवर अतिक्रमण झाल्याची तक्रार आलेली आहे. संबंधितास नोटीस बजावली असून, अतिक्रमण न काढल्यास कारवाई करण्यात येईल.
– आर. एच. देशमुख, ग्रामविकास अधिकारी, तिसगाव
पुरातन बारवांवर अतिक्रमण करणे चुकीचे असून, ग्रामपंचायतीसह जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. कारवाई न झाल्यास उपोषण करणार.
– सतीश साळवे, सामाजिक कार्यकर्ते, तिसगाव
Tags :
12562
10





