दोन मालट्रकना एकच नंबरप्लेट, पोलिसांत ट्रकमालकावर गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दोन मालट्रकना एकाच क्रमांकाच्या नंबर प्लेट वापरून शासनाची फसवणूक करणाऱया मालकाविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण शिवाजी चौधरी (रा.
भातकुडगाव, ता. शेवगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रकमालकाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक सुनील गोसावी यांनी फिर्याद दिली आहे.
सुनील गोसावी यांच्या नेतृत्वाखालील वायुवेग पथक 16 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील सुरेगाव फाटा येथे वाहनांची तपसाणी करत होते. यावेळी एमएच 20, ए 1952 या क्रमांकाचा ट्रक थांबवून चालकाकडे वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली असता, चालकाकडे वाहन परवाना आढळून आला नाही. त्यामुळे वाहनाचा चासिस नंबर तपासला असता तो बनावट प्रिंट केलेला दिसून आला. तसेच, इंजिन नंबर असलेली प्लेटही काढून घेतलेली आढळली. त्यामुळे वरील क्रमाकांच्या वाहनाची तपासणी केली असता, ते मूळ वाहन शेवगाव तालुक्यात मिळून आल्याने ते वाहन पथकातील मोटार वाहन निरीक्षक शाम चौधरी हे नेवासा येथे घेऊन आले. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ट्रकमालक लक्ष्मण चौधरी याच्यावर नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.