महाराष्ट्र
पाथर्डीतील चोरी लुटमारी विरोधात भर चौकात लाक्षणिक उपोषण
By Admin
पाथर्डीतील चोरी लुटमारी विरोधात भर चौकात लाक्षणिक उपोषण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी - शहरातील वाढती गुन्हेगारी,वाहतूक कोंडी,राजरोस चालणारे अवेध धंदे याविरुद्ध आवाज उठवुन गुन्हेगारी हटाव शहर बचाव चा नारा देत निष्क्रिय पोलीस अधिकारी व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते नागनाथ गर्ज़े यांच्या लाक्षणिक उपोषण आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होऊन स्थानिक पोलीस व लोकप्रतिनिधींवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भाजपाच्या आमदार व खासदार असूनही भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी केलेली टीका चर्चेचा विषय ठरली आहे .
शहर व तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला असून बिंगो जुगार,राजरोस चालणारा मटका,दोन्ही बस स्थानकावर व आठवडे बाजारात मोबाईल चोरासह साखळी चोराचे रॅकेट,वाहन चोर,चेहऱ्यावर गुंगीचे स्प्रे मारून लुटालुट करणे,छोट्या मोठ्या घरफोडया,विद्यार्थिनी व महिलांची छेडछाड आदी प्रकारच्या गुन्हेगारीने शहरात उच्छाद मांडला आहे.पोलिसांचे अस्तित्व कोठेही दिसत नाही.पोलीस चौकीसह परिसरात सर्वत्र अतिक्रमणे वाढवून वाहन चालकांना वाहने सुद्धा चालवता येत नाहीत.मन मानेल त्या पद्धतीने पार्किंग केल्याने आंबेडकर चौक,नवी पेठ,नाईक चौक,अजंटा चौकात वारंवार वाहतूक कोंडी होते.पोलिसांचे अस्तित्व कोठे जाणवत नाही.मात्र लोकप्रतिनिधींना काही देणे घेणे नाही.तालुक्यात कोठेही प्रशासनाचे अस्तित्वात नाही.भूमी
अभिलेख,पालिका,पंचायत समिती,महसूल विभाग,आरोग्य विभाग,राज्य परिवहन,कृषी विभाग शिक्षण विभाग, राज्य व राष्ट्रीय महामार्ग विभाग अशा कोणत्याही विभागावर लोकप्रतिनिधींचा वचक नाही. तालुक्यात सर्वत्र व्हाईट कॉलर म्हणजे ठेकेदार व दलालांचे साम्राज्य कोणी निर्माण केले? तालुक्याला कोणी वाली आहे की नाही अशा शब्दात प्रमुख व्यक्तींनी भावना व्यक्त केल्या.यामध्ये माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे भाजप युवा मोर्चाचे अमोल गर्ज़े मुकुंद गर्जे सुनील पाखरे मनसेचे संतोष जिरेसाळ व अविनाश पालवे काँग्रेसचे महेश दौंड राष्ट्रवादीचे योगेश रासने व देवा पवार आम आदमीचे किसन आव्हाड शिवसेनेचे भगवान दराडे सचिन नागपुरे सुरेश हुलजुते व्यापारी संघटनेचे अभय गांधी वंचित आघाडीचे गुरु म्हस्के शफिक आतार माजी नगरसेवक बंडू बोरुडे व संजय भागवत चांद मणियार आदीसह इतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त करताना अनेकांचा टीकेचा रोख थेटपणे करण्यात आला होता.
यावेळी बोलताना किसन आव्हाड म्हणाले,गुन्हेगारांना लोकप्रतिनिधींचे संरक्षण असून ठेकेदारीच्या माध्यमातून पुढाऱ्यांनी गुंड व गुन्हेगारांना जवळ केले आहे. पाथर्डीची बाजारपेठ निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे उध्वस्त झाली असून खरवंडी कासार नंतर पाथर्डीची बाजारपेठ स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहे. दिवसा ढवळ्या लोकप्रतिनिधींचे गुंड खाजगी प्रॉपर्टीवर कब्जा करतात. अत्याचारी सावकार व गुन्हेगारांना राजाश्रय मिळतो.पाथर्डीत गुन्हा नोंदवण्यासाठी सुद्धा हात ओले करावे लागतात. सोंग घेतलेल्या लोकप्रतिनिधींना पायउतार करण्याची वेळ आली आहे. पालिकेला नुकतेच दहा कोटी रुपये प्राप्त झाले. टक्केवारी व ठेकेदाराकडून याची कशी विल्हेवाट लावली जाते याची कामापूर्वीच चर्चा असून मर्जीतील माणसांना निधीची खैरात वाटण्यामागे असलेले गुपित लवकरच उघड करू. निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्यांची त्वरित बदली करावी अन्यथा गाव बंद ठेवून सर्वपक्षीय मोर्चा काढू अशा
शब्दात वक्त्यांनी भावना व्यक्त केल्या. दुपारी उशिरा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील व रामेश्वर कायंदे यांनी आंदोलकांशी चर्चा करून मागण्याबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषण आंदोलनात जोरदार भाषण बाजीने गर्दी वाढत गेली.चोरट्यांनी येथेही चोरीची कसर ठेवली नाही.मन लावून भाषण ऐकत टाळ्या वाजवून दाद देणाऱ्या एका सामान्य नागरिकाची चप्पल चोरट्याने चोरून नेली. चोरीचा विरोधात आंदोलन सुरू असताना चोरट्यांनी करामत दाखवल्याने तो विषय चर्चेत ठरला.
Tags :
1023561
10