महाराष्ट्र
15580
10
तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला आग
By Admin
तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला आग लागून उपचाराचे साहित्य जळाले;चौकशीची मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला शनिवारी (दि.11) पहाटे आग लागली. आगीत कोरोना उपचाराचेे सर्व साहित्य जळून खाक झाले.
यावेळी दोन कर्मचारी उपस्थित असतानाही, त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला नसल्याचे बोलले जात आहे. आग लागली का कोणी लावली, याबाबत तिसगाव ग्रामस्थांमधून संशय व्यक्त केला जात आहे.
तिसगाव आरोग्य केंद्राच्या दोन इमारती आहेत. जुन्या इमारतीमध्ये आरोग्य केंद्राचे काही साहित्य ठेवले होते. सोलर सिस्टिम लावलेल्या इमारतीला शनिवारी पहाटे आग लागली. आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात खिडकीतून बाहेर येऊ लागल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ कर्मचार्यांना आगीची माहिती दिली. परंतु, या कर्मचार्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न न करता केवळ तशी माहिती वरिष्ठांना कळविली. सकाळी सात वाजता अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर आग विझविण्यात आली.
या आगीत नेमके किती नुकसान झाले, याची अधिकृत माहिती वैद्यकीय अधिकार्यांकडून देण्यात आली नाही. या इमारतीत पीपीई किट व कोरोना संबंधी साहित्य ठेवलेले असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, नंतर त्यांनी आगीत काहीच नुकसान झाले नसल्याचे सांगून या घटनेबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वी या आरोग्य केंद्रातून बॅटरीसह अनेक साहित्याची चोरी झाली आहे. एवढे प्रकार घडूनही वरिष्ठ अधिकारी या कर्मचार्यांवर कारवाई करण्यास का घाबरतात, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. दरम्यान, तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीमध्ये नुकसान होईल, असे कोणतेही साहित्य ठेवलेले नव्हते. घटनेबाबत पाथर्डी पोलिसात रीतसर फिर्याद दाखल करणार आहे, असे तिसगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब होडशीळ यांनी सांगितले.
आगीची चौकशी व्हावी
आग लागलेल्या इमारतीत ग्लुकोजचे 2022 सालचे पुडे आढळून आले आहेत. आगीत वैद्यकीय साहित्याची मोठ्या प्रमाणात राख झाली आहे. मात्र, संबंधित डॉक्टर, कर्मचारी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोविड सेंटरमधील काही लोखंडी कॉट व गाद्या, चार्जिंग बॅटरी देखील चोरीला गेली आहे. त्यामुळे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सतीश साळवे यांनी केली आहे.
अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करा
तिसगाव आरोग्य केंद्राच्या इमारतीला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करावी. तिसगावचे वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून, त्यांच्यावर कारवाई करण्यात मागणी ग्रामस्थ यांनी केली आहे.
Tags :
15580
10





