महाराष्ट्र
23232
10
घरकुलासाठी पंचायत समितीवर आरती मोर्चा
By Admin
घरकुलासाठी पंचायत समितीवर आरती मोर्चा
इगतपुरी : तालुक्यातील वंचित
आदिवासींना हक्काचे घरकुल मिळावे, या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली टिटोली ते पंचायत समिती कार्यालयावर आरती मोर्चा काढण्यात आला. आदिवासींना घरकुल मिळावे, यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना अनेक वेळा प्रस्ताव दिलेले आहेत. मात्र, या प्रस्तावावर काहीच कार्यवाही होत नसल्यामुळे मंगळवारी (दि.९) गटविकास अधिकाऱ्यांना प्रसन्न करण्यासाठी
आरती मोर्चा काढण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील बेघर असलेल्या आदिवासी, गरीब, भूमिहीन, विधवा, अपंग अशा पात्र लाभार्थ्यांनी
शबरी घरकुल योजनेमधून घरकुल मिळावे म्हणून पंचायत समिती कार्यालयात अर्ज दाखल केले होते. मात्र, पंचायत समितीमध्ये असलेले प्रस्ताव तसेच पडून आहेत. सदर प्रस्ताव परिपूर्ण करून तत्काळ आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात पाठविणे आवश्यक होते.
इगतपुरी पं. स. कार्यालयावर एल्गार कष्टकरी संघटनेने काढलेला आरती मोर्चा.
मात्र, अनेक वेळा चर्चा करूनही प्रस्ताव पुढे न पाठवल्यामुळे आरती मोर्चा काढून आदिवासींना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी दिली. दरम्यान, घरकुलांचे प्रस्ताव तातडीने तयार करून आदिवासी विभागाच्या
कार्यालयात पाठवण्यात येतील, तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे यांनी दिले.
मोर्चात मंगल खडके, मथुरा भगत, चंद्राभागा आगिवले, लता मंगळ, सुनीता शिद, ताराबाई अस्वले, संतू ठोंबरे, तानाजी पदीर, तानाजी कुंदे, काळू निरगुडे, हौशिराम भाऊ, चदर बदादे, राजू मेंगाळ, रामदास सावंत, रवी मळेकर, राम वाघ, मोहन शेवरे, वसंत इरते, मीरा गांगड, सुनीता सावंत यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
Tags :
23232
10





