शेवगाव : पोलिसांचा महानिरीक्षकांकडून गौरव; प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करण्यात विशेष कामगिरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गतवर्षी जिल्ह्यात सर्वात जास्त प्रलंबित गुन्ह्याचा तपास करण्यात शेवगाव पोलिसांनी विशेष कामगिरी केल्याने या पोलिस ठाण्याचा विशेष पोलिस महानिरीक्षकांनी प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला.
शेवगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी सन 2022 मध्ये नगर जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या तुलनेत प्रलंबित असलेले सर्वाधिक 37 मालमत्तेविरूद्ध गुन्हे उकल केले. या गुन्ह्यातील 7 ट्रॅक्टरसह दोन मोटारसायकली, पाणबुडी मोटारी, सोने-चांदीचे दागिने, काळ्या बाजारात जाणारे स्वस्त धान्य दुकानातील धान्य असा 35 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करून तो मूळमालकास परत दिला. जून ते डिसेंबर या सात महिन्यांत 83 टक्के मुद्देमाल हस्तगत करून शेवगाव पोलिसांनी सर्वोकृष्ट कामगिरी केली.
ट्रॅक्टर चोरीमुळे हतबल झालेल्या शेतकर्यांना कर्ज परतफेडीची चिंता लागली होती. मात्र, पोलिसांच्या प्रयत्नाने अवघ्या काही दिवसांत याचा तपास लागल्याने त्यांनी पोलिसांवर विश्वास दर्शविला. शेवगाव पोलिसांच्या या कौतुकास्प़द कामगिरीबाबत नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी प्रशस्तीपत्रक देऊन अधिकारी व अंमलदारांचा गौरव केला. ही कामगिरी शेवगावचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा, आशिष शेळके, रवींद्र बागूल यांच्यासह कर्मचार्यांचा यांनी केली.