महाराष्ट्र
22746
10
जन्मभूमीचा पुरस्कार हाच माझ्यासाठी ऑस्कर पुरस्कार- आशिष निनगुरकर
By Admin
जन्मभूमीचा पुरस्कार हाच माझ्यासाठी ऑस्कर पुरस्कार- आशिष निनगुरकर
सुवर्णयुग तरुण मंडळ पुरस्कार वितरण सोहळा
पाथर्डी- प्रतिनिधी
आपले ध्येय निश्चित असेल आणि नेमके आपल्याला आयुष्यात काय करायचे, हे ठरलेले असेल तर जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही. प्रामाणिक व कष्टाची नाळ बांधली तर जीवन ध्येय सहजरित्या प्राप्त होते.गावच्या जन्मभूमीत पाथर्डी गावाने दिलेला हा साहित्यरत्न पुरस्कार माझ्यासाठी ऑस्कर पुरस्कार असल्याचे प्रतिपादन युवालेखक आशिष निनगुरकर यांनी केले.
सुवर्णयुग मंडळाच्या वतीने आयोजित पाथर्डीच्या शेवाळे गल्लीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यास आशिष बोलत होते.यावेळी व्यासपीठावर व्याख्याते गणेश शिंदे,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,माजी नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे,लायन्स क्लबचे डॉ.भाऊसाहेब लांडे,आनंदवन चे प्रमुख संदीप राठोड व मंडळाचे वैभव शेवाळे,मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरवर्षी सुवर्णयुग मंडळाच्या वतीने साहित्य- कला क्षेत्रात व पर्यावरण तसेच सामाजिक क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या व्यक्तींना
पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सिनेसृष्टीशी संबंधित अभिनय,मालिकालेखन,चरित्रलेखन व गीतलेखन अशा क्षेत्रात आशिष गेल्या अनेक वर्षांपासून मुशाफिरी करत आहे. एकूणच साहित्य व कला क्षेत्राच्या कार्याची दखल घेऊन सुवर्णयुग मंडळाने 'राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार' साठी आशिष यांची निवड केली.तसेच संदीप राठोड यांच्या आनंदवन या सामाजिक उपक्रमांतर्गत गोष्टींची दखल घेऊन त्यांनादेखील पुरस्काराने गौरविण्यात आले.या दोन हरहुन्नरी व्यक्तीमत्वांना मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी गणेश शिंदे यांचे 'हे जीवन सुंदर आहे' या विषयावर व्याख्यान झाले.संवाद साधतांना शब्द जपून वापरले पाहिजेत.चांगले बोलण्यामुळे माणसाचे जीवन सुंदर आणि आनंदी बनते. शब्दांमुळेच रामायण घडले आहे. माणसाची अहंकारी वृत्ती स्वतःच्या जीवनाचा आनंद हिरावून घेत आहे,असे प्रतिपादन व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,डॉ. मृत्युंजय गर्जे, लायन्स क्लबचे डॉ.भाऊसाहेब लांडे,माजी नगरसेवक दीपक देशमुख, चैतन्य अर्बनचे अध्यक्ष राजेंद्र काळे, वैभव शेवाळे, बंडू दानापुरे, राजेंद्र शेवाळे, योगेश घोडके, प्रतीक वेलदे, उमेश रासने, सोनल जोजारे, कमलेश मुथ्था व डॉ. अभय भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले, मनुष्याने चांगले जीवन जगले पाहिजे. आपला आनंद हा भौतिक साधनांमध्ये नसून तो आपल्या मनाशी असतो. म्हणून आपल्याला आपल्या आनंदाच्या जागा शोधता यायला हव्यात. भगवंतांनी दिलेलं हे जीवन इतकं सुंदर असून जन्माला येण्याचे संकेत नऊ महिन्यांपूर्वी मिळतात, मात्र मृत्यूचे संकेत मिळत नाहीत.त्यामुळे आपल्या हातून जेवढे चांगले कार्य होईल,तेवढे चांगले कार्य करावे.यावेळी अभय आव्हाड,संदीप राठोड यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक वैभव शेवाळे यांनी तर सूत्रसंचालन अभय गांधी आणि आभार शाहरुख शेख यांनी मानले.
Tags :
22746
10





